लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीय विश्वात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. सध्या रोबोटिक शस्त्रक्रिया ही आधुनिक पद्धती फक्त खासगी रुग्णालयात आहे. मात्र या शस्त्रक्रियांचा खर्च अफाट असतो. तो गरिबांना परवडत नाही. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने आता या शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परवडाव्यात म्हणून जे जे रुग्णालयातसुद्धा रोबोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३२ कोटी २२ लाख ६० हजार रुपये मंजूर केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील रोबोट खरेदी करणारे ‘जे जे’ हे मुुंबईतील पहिले रुग्णालय ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. शस्त्रक्रियेच्या प्रचलित पद्धतीला छेद देत बहुतांश ठिकाणी आता लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. पोटावर एक किंवा दोन छिद्रे करून या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र त्यापुढे जाऊन प्रगत देशांत करण्यात येणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रिया आता खासगी रुग्णालयांत होत आहेत. या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना वेदना कमी होतात, कमी रक्तस्राव होतो. तसेच रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो.
वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग रुग्णालयासाठी अत्याधुनिक उपकरणे पुरवत असतो. मात्र निविदा प्रक्रियेत खूप वेळ जातो. खरे तर रोबोटसारखे उपकरण जे जे रुग्णालयात यापूर्वीच यायला हवे होते. मात्र आर्थिक तरतुदीअभावी हा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला होता. मात्र आता निधी मंजूर झाला आहे, तर विभागाने तत्काळ पावले उचलून निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे.
या विभागातील डॉक्टरांनी जगभरातील मोठमोठ्या वैद्यकीय परिषदांमध्ये आपल्या शस्त्रक्रियांचे सादरीकरण केले आहे. त्यासाठी त्यांना पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. या विभागात रोबोट आल्यानंतर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेवेळी होणारा त्रास कमी होणार आहे. रोबोटमुळे मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जातील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. जे जे रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभाग नवनवीन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाची दोन प्रमुख कामे आहेत. रुग्णांना दर्जेदार सेवा देणे आणि दुसरे डॉक्टर घडविणे, विद्यार्थ्यांना शिकविणे. सध्या रोबोटिक शस्त्रक्रियांचा लाभ गरीब रुग्णांना मिळावा, त्याचबरोबर रुग्णालयातील विद्यार्थ्यांना या रोबोटिक शस्त्रक्रिया शिकता याव्यात, यासाठी रोबोटची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत अशा पद्धतीचे अत्याधुनिक उपकरण खरेदी केले जाणार आहे. - राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग