रोहन तोडकरचा मृत्यू : मराठा आरक्षणासाठी मृत आंदोलकाच्या वडिलांची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:26 AM2018-11-08T03:26:31+5:302018-11-08T03:27:00+5:30
‘माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही, पण मराठा समाजातील इतर युवकांना तरी सरकारने न्याय द्यावा’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या रोहन तोडकर या आंदोलकाच्या वडिलांनी केले आहे.
मुंबई - ‘माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही, पण मराठा समाजातील इतर युवकांना तरी सरकारने न्याय द्यावा’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या रोहन तोडकर या आंदोलकाच्या वडिलांनी केले आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी ते आझाद मैदानात आले होते.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आंदोलनादरम्यान रोहन तोडकर या तरूणाची हत्या झाली होती. त्यावेळी रोहनचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला होता. रोहनला न्याय मिळवून देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कुटुंबियांनी परिस्थिती अधिक चिघळू नये, म्हणून रोहनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. मात्र
तीन महिन्यांनंतरही जिल्हाधिकाºयांनी कोणतेही आश्वासन पाळले नसल्याचा आरोप रोहनच्या वडिलांनी केला आहे. शासकिय नोकरी, आर्थिक नुकसान भरपाई ही लेखी आश्वासनेही हवेत विरल्याचे रोहनच्या वडिलांचे म्हणणे आहे.
तसेच आंदोलनादरम्यान ज्या तरूणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी रोहनच्या वडिलांनी केली आहे. रोहनला न्याय मिळालेला नसून मराठा आरक्षणाचा कोणताही फायदा आता कुटुंबाला होणार नाही, मात्र गुन्हे मागे घेऊन सरकारने इतर तरूणांना तरी आरक्षण देत न्याय देण्याचे आवाहन रोहनच्या वडिलांनी केले आहे.
रोहनच्या कुटुंबाला मराठा क्रांती मोर्चाच्या नवी मुंबई समन्वयक आणि मराठा हेल्पलाईनतर्फे यावेळी आर्थिक मदतही करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिलेल्या निष्पाण तरूणांवरील गुन्हे सरकारने तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
२६ नोव्हेंबरला अधिवेशनावर धडक
आरक्षणासह सर्व मागण्यांसाठी आंदोलनाला दिशा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा २६ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनावर मुंबईला धडकणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.
दरम्यान, १६ ते २६ नोव्हेंबरदरम्यान जिल्हानिहाय संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रांमध्ये आंदोलनाला दिशा देण्यासाठी विभागनिहाय बैठकाही होणार असल्याचे समन्वयकाने स्पष्ट केले.