मुंबई - बा. भ. भोरकरांच्या काव्यात आढळणारी सहजता, चित्रमयता रोहिणी निनावेंच्या काव्यात अनुभवायला मिळतेच, पण कुसुमाग्रजांच्या काव्यातून मिळणारा मुहावरे वजा संदेशही या कविता देतात. भाषेची प्रासादिकता, कृतज्ञतेची तृप्तता आणि हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या कविता वास्तवाची जाण करून देणाऱ्या असल्याचे लेखक आणि निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांनी काढले. लेखिका रोहिणी निनावे यांच्या 'सातवा ऋतू' या पहिल्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
मागील २७ वर्षे मराठी-हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात लेखन करणाऱ्या आणि १२ हजारांपेक्षा जास्त एपिसोड्स लिहिणाऱ्या रोहिणी यांच्या 'सातवा ऋतू' या काव्य संग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या सोहळ्याला कवी अरुण म्हात्रे, अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ आणि अभिनेता सुबोध भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याखेरीज दिग्दर्शक कुमार सोहोनी, शिल्पा नवलकर, अमृता राव, अभिजीत गुरु, पल्लवी करकेरा आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी आसावरी जोशी, जुई गडकरी, शमा निनावे, आस्ताद काळे, मिलिंद फाटक आणि प्रसाद आठल्ये यांनी रोहिणी यांच्या निवडक कवितांचे वाचन केले.
'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी रोहिणींमधील लेखिकेचे कौतुक करत मालिका लिहिणे हे सोपे काम नसून रोहिणी ते व्रतस्थपणे करत असल्याचे म्हणाले. निवेदिता म्हणाल्या की, वसंत निनावे यांची कन्या म्हणून रोहिणी मला परिचित होती, पण 'अगं बाई सासूबाई' या मालिकेमुळे आम्ही प्रत्यक्षात भेटलो. स्त्रीच्या अंतरमनातील भावना रोहिणी खूप चांगल्या प्रकारे मांडते. याचा प्रत्यय 'अगं बाई सासूबाई'च्या निमित्ताने आला. एखादा विषय मांडण्याची तिची लेखनशैली जितकी हळुवार आहे, तितकीच ती सहज सुंदर असल्याचेही त्या म्हणाल्या.
संजय सूरकर आणि स्मिता तळवलकर यांच्यामुळे रोहिणी यांच्याशी बंध जुळल्याचे सांगत सुबोध म्हणाला की, रोहिणी यांच्या ओघवत्या भाषाशैलीमुळे मालिकेचे लिखाण करणाऱ्या लेखाचे महत्त्व कळले. शेवटी आम्ही कलाकार 'लमाण' आहोत. लेखाचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. त्यांच्या लिखाणाइतक्याच त्यांच्या कविताही सहज सुंदर असल्याचे सुबोध भावे म्हणाला.
मालिकांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहीत असताना वडील वसंत निनावे यांच्याकडून लाभलेल्या कविता लिहिण्याच्या वारसा आणि प्रोत्साहन यामुळे मी शीर्षक गीते लिहू लागल्याचे रोहिणी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, अनेकदा शीर्षक गीते लिहिताना बंधने येतात. त्या बंधनांच्या पलीकडचे लिखाण म्हणजे या कविता आहेत. अशा निवडक कवितांचा संग्रह म्हणजे 'सातवा ऋतू' आहे. वास्तवात सहा ऋतू आहेत, पण आनंदी आणि आशावादी करणारा स्वतःचा सातवा ऋतू देखील निर्माण करायला हवा असेही त्या म्हणाल्या.