Join us

प्रो कबड्डीतल्या बंगळुरू बुल्सच्या रोहित चिल्लरला पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी अटक

By admin | Published: October 21, 2016 12:41 PM

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रो कबड्डी लीगमधला बंगळुरू बुल्सचा कबड्डीपटू रोहित चिल्लरला शुक्रवारी सकाळी अटक केली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रो कबड्डी लीगमधला बंगळुरू बुल्सचा कबड्डीपटू रोहित चिल्लरला शुक्रवारी सकाळी अटक केली. रोहित चिल्लरवर पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. रोहितच्या पत्नी ललिता दाबासने (२८) लग्नानंतर काही महिन्यातच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. दिल्लीतील आपल्या आई-वडिलांच्या घरी असताना तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. 

सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ललिताच्या रुममध्ये एक चिठ्ठी सापडली असून, या चिठ्ठीत तिने रोहित आणि त्याचे आई-वडिल हुंडयासाठी आपला छळ करत होते असा आरोप केला होता. यावर्षीच मार्च महिन्यात ललिता आणि रोहितचे लग्न झाले होते. मागच्या काही आठवडयांपासून ती आपल्या आई-वडीलांच्या घरी रहात होती. 
 
 नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये रोहितने बंगळुरु बुल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. रोहितला आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीत हिस्सा हवा होता असा आरोप ललिताने केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये तिने तिचा मोबाईल फोन अनलॉक करण्याचा कोडही लिहीला होता. यामध्ये तिने दोन व्हॉईस मेसेजस रेकॉर्ड करुन ठेवले होते.  एक मेसेज जवळपास अडीच तासांचा आहे. रोहित कुमार विरोधात हुंडा आणि छळवणुकी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित कुमार २००९ पासून नौदलाच्या सेवेत आहे. स्पोटर्स कोटयातंर्गत त्याला ही नोकरी मिळाली आहे.