Join us

Rohit Patil: दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक, आर.आर. आबांच्या आठवणींनी पाटील कुटुंबीय गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 3:53 PM

Rohit Patil: 14 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदके’ जाहीर झाली होती

मुंबई - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील हे सप्टेबर 2021 मध्ये पोलीस खात्यातून निवृत्त झाले. निवृत्तीवेळी ते करवीरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सख्खा भाऊ राज्याचा गृहमंत्री असतानाही त्यांनी त्याचा फायदा न घेता प्रकाशझोतात न येता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. 33 वर्षांच्या पोलीस सेवेमध्ये राजाराम पाटील यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते दुसऱ्यांदा त्यांनी राष्ट्रपती पदक स्विकारले. यावेळी, पाटील कटुंबीयांस गहिवरुन आले होते.  

14 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदके’ जाहीर झाली होती. त्यामध्ये, राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू सहायक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले होते. तेव्हा जाहीर झालेले राष्ट्रपती पदक सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी, संपूर्ण पाटील कुटुंबीय राजभवनात उपस्थित होते. 

आ.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. 'माझे चुलते आदरणीय तात्यांच्या दुसऱ्या राष्ट्रपती पदक वितरण सोहळ्याला राजभवन मुंबई येथे सहकुटुंब सर्वजण उपस्थित होतो. स्व. आबा गृहमंत्री असताना ज्यावेळेस पहिल्यांदा तात्यांचे नाव या पदकासाठी आले होते त्यावेळेस आबा त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून उपस्थित होते, पण कधीकाळी फाटकी कपडे घालणारे भावंड एकाच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री म्हणून आणि एक भाऊ पदक प्राप्त म्हणून उपस्थित असताना त्या दोन्ही मनाच्या भावना काय असतील हा विचार आज कार्यक्रमाला उपस्थित राहताना आला. आजच्या कार्यक्रमाला आबांची प्रमुख उपस्थितीची उणीव आम्हा सर्वांसाठी अत्यंत भावनावश होती. पण मानाचे पदक दुसऱ्यांदा मिळाले याचा आनंद देखील आम्हा सर्वांना होता,' अशी भावनिक आठवण रोहित पाटील यांनी ट्विटरवरुन सांगितली. 

दरम्यान, राजाराम पाटील हे सप्टेंबर 2021 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या ड्युटीवरील अखेरच्या दिवशी त्यांनी आईला कडक सॅल्यूट ठोकून वर्दीचा निरोप घेतला होता. त्यावेळचा, त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  (R.R. Patil's brother Rajaram Patil retires from police department, emotional salute to mother on last day)

भाऊ गृहमंत्री असतानाही जबाबदारीने काम

एकीकडे आर.आर. पाटील राजकीय क्षेत्रात यशाची एक एक पायरी चढच असताना राजाराम पाटील यांनी पोलीस खात्यात सेवा सुरू केली. फौजदार म्हणून सुरुवात करणाऱ्या राजाराम पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक, निरीक्षक असे टप्पे पार करत निवृत्तीवेळी पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारली. मात्र, या काळात आपण एका गृहमंत्र्याचे भाऊ असल्याचा कधी फायदा घेतला नाही. उलट आपल्यामुळे राज्याचा गृहमंत्री असलेला आपला भाऊ कधी अडचणीत येऊ नये यासाठी त्यांनी सेवा बजावताना नेहमीच खबरदारी घेतली होती.  

टॅग्स :रोहित पाटिलमुंबईभगतसिंगपोलिस