संक्रातीला वहिनींसाठी साडी, चिमुकल्यांच्या मार्केटींगचं रोहित पवारांना कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:39 PM2020-01-10T17:39:41+5:302020-01-10T17:40:50+5:30

या बाजारात लहान मुलांनी स्वतः तयार केलेले काही पदार्थ, खेळण्या तसेच भाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

Rohit Pawar appreciates marketing of sarees, in karjat jamkhed zp school | संक्रातीला वहिनींसाठी साडी, चिमुकल्यांच्या मार्केटींगचं रोहित पवारांना कौतुक

संक्रातीला वहिनींसाठी साडी, चिमुकल्यांच्या मार्केटींगचं रोहित पवारांना कौतुक

googlenewsNext

मुंबई - कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी संक्रातीनिमित्त पत्नी कुंती यांच्यासाठी साडी खरेदी केली आहे. मात्र, ही साडी खरेदी करण्याची कथा खूपच मनोरंजक व लक्षणीय आहे. एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी ही साडी खरेदी केली. विद्यार्थ्यांचं मार्केटींग स्कील पाहून त्यांनाही आश्चर्य आणि आनंद वाटल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन म्हटले आहे. 
‘महाराजस्व अभियाना’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी ‘सृजन’च्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिबीरांसाठीच्या बैठकीला जात असतांना फक्राबाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. या शाळेत, लहान वयातच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, या हेतूने शाळेने लहान मुलांसाठी ‘आनंदी बाजार’चं आयोजन केलं होतं.

या बाजारात लहान मुलांनी स्वतः तयार केलेले काही पदार्थ, खेळण्या तसेच भाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यांची विक्री करुन पैसे कसे मिळवावे, याबाबतचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. रोहित यांनी या बाजारात एक फेरफटका मारला. फिरताना विद्यार्थ्यांनी विक्रीला ठेवलेल्या काही पदार्थांची चवही चाखली. काही विद्यार्थ्यांनी खेळ ठेवले होते त्या खेळांचाही त्या विद्यार्थांसोबत आनंद घेतला. काही विद्यार्थ्यांनी साड्या आणि रुमाल विक्रीचा स्टॉल लावला होता. 

रोहित पवार त्यांना भेटले त्यावेळी, ‘‘दादा आता संक्रांत आलीय… तर वहिनींसाठी एक साडी घेऊन जा…’’ असा प्रेमळ आग्रह या मुलांनी केला. मुलांचा हा आग्रह मला काही मोडता आला नाही. त्यामुळे, त्यांच्याकडून मी एक साडी खरेदी केली, असे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच, इतक्या लहान वयातही कसं मार्केटिंग करायचं याबाबत त्यांचं स्कील पाहून मला त्या मुलांचं खूप कौतुक वाटलं. अशा प्रकारे एका आगळ्या-वेगळ्या बाजारात फेरफटका मारण्याचा आणि खरेदी करण्याचा असा दुहेरी आनंद मला घेता आल्याचे रोहित यांनी फेसबुकवरुन सांगितले. 
 

Web Title: Rohit Pawar appreciates marketing of sarees, in karjat jamkhed zp school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.