मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे. लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगलं खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसंच हे ईडीचं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसंलं की काहीही करून चिडायचं. फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे, असे विधान रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन केले आहे.
राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पवारांवरील केलेली कारवाई राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप पवार समर्थकांनी केला आहे. शरद पवारांच्या समर्थनार्थ बारामती बंदची हाक कार्यकर्त्यांनी दिली आहे. तर, राष्ट्रवादीचे नेतेही भाजपा सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी पवारांवरील ईडीच्या कारवाईला लहान मुलांमधील खेळाची उपमा दिली आहे. चांगलं खेळता येत नसलं की काहीही करुन चिडायचं. पण, एक गोष्ट लक्षात असू द्या आपला गडी लय भारी आहे, असे म्हणत रोहित यांनी सत्ताधारी भाजपावर नाव न घेता टीका केली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. बारामती बंद करणं हास्यास्पद असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदचं आवाहन केलं आहे. हे हास्यास्पद आहे. चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी असं सांगत बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? मात्र त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होतं अशा शब्दात दमानिया यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.