Join us  

'महाराष्ट्रद्वेष्ट्याकडून राज्याची सुटका', नवीन राज्यपालांकडून रोहित पवारांना 'ही' अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 1:28 PM

राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या सेवेतून मला मुक्त करा, अशी विनंती पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती

राजकीय निर्णय आणि आपल्या विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर, भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून गेल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासोबतच नवीन राज्यपालांवरही भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. आता, रोहित पवार यांनीही ट्विट करुन नवीन राज्यपालांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.  

राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या सेवेतून मला मुक्त करा, अशी विनंती पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. त्यानंतर, राष्ट्रपती मुर्मूंकडे राजीनामाही पाठवला होता. त्यानुसार, अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या राजीनामा स्वीकारल्याचे स्वागत केले. तर रोहित पवार यांनीही तसेच ट्विट करुन कोश्यारींना महाराष्ट्रद्वेष्टा म्हटले आहे. 

उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका झाल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन करत त्यांच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. राज्यपाल बैस संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा, रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करुन नवीन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

काय म्हणाले जयंत पाटील

'महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो'असं जयंत पाटील यांनी ट्विमध्ये म्हटले आहे. 'नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.   

टॅग्स :रोहित पवारमहाराष्ट्रमुंबईभगत सिंह कोश्यारी