Join us  

भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांआधी रोहित पवार आग्रही होते; 'या' आमदाराचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 8:24 PM

आमदार सुनिल शेळके यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

मुंबई- राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसत आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता अजितदादा गटातील आमदार सुनिल शेळके यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर! कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार

आमदार सुनिल शेळके म्हणाले, 'भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांच्या अगोदर आमदार रोहित पवार आग्रही होते. आम्ही सर्व पहिल्या टर्मचे असलेल्या आमदारांनी रोहित पवार यांच्या नेतृत्वात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी भाजपसोबत जावे लागले तरी चालेल असा आग्रह पवार यांनी केला होता. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अगोदर रोहित पवार यांनी ही आग्रही भूमिका साहेबांच्याजवळ मांडली होती, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.

'रोहित पवार गेल्या काही वर्षापासून राज्यात दादा होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी दुसऱ्याला स्वार्थी म्हणू नये, असा टोलाही आमदार सुनिल शेळके यांनी लगावला आहे.  

तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही रोहित पवार यांच्या टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, रोहित पवार आमदार झाल्यापासून त्यांना अजित पवार यांनी २ हजार कोटी रुपये निधी दिला आहे.  राज्यात फक्त एकच दादा आहेत ते म्हणजे अजितदादा असंही मिटकरी म्हणाले. 

राष्ट्रवादीत आता दोन गट पडल्याचे दिसत आहे, आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गट नेत्यांना विकासकामे मंजूर करुन त्यांच्याकडून प्रतिज्ञा पत्रावर सह्या घेत असल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, तोपर्यंत तुमची कामं करणार नाही, अशा पद्धतीनं ब्लॅकमेल केलं जात आहे, असा आरोपही रोहित पवारांनी केला. यावरुन दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारशरद पवार