Rohit Pawar: 'महाराष्ट्र बैलगाडा शर्यत केसरी' स्पर्धा सुरू करा, रोहित पवाराचं पशुसंवर्धन मंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 01:04 PM2022-03-25T13:04:04+5:302022-03-25T13:04:45+5:30

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती (Bullock cart race)पार पडल्या

Rohit Pawar: Launch 'Maharashtra Bullock Cart Saffron' Competition, Rohit Pawar's letter to Animal Husbandry Minister | Rohit Pawar: 'महाराष्ट्र बैलगाडा शर्यत केसरी' स्पर्धा सुरू करा, रोहित पवाराचं पशुसंवर्धन मंत्र्यांना पत्र

Rohit Pawar: 'महाराष्ट्र बैलगाडा शर्यत केसरी' स्पर्धा सुरू करा, रोहित पवाराचं पशुसंवर्धन मंत्र्यांना पत्र

Next

मुंबई - राज्यात बंद असलेल्या बैलगाडा शर्यतींना (Bullock cart race) सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यामुळे आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल 7 वर्षांनी महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला आहे. सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिल्याने नियमांचे सर्व पालन काटेकोरपणे करुनच बैलगाडा शर्यत पार पाडाव्या लागणार आहेत. त्यातच, आता आमदार रोहित पवार यांनी 'महाराष्ट्र बैलगाडा शर्यत केसरी' ही स्पर्धा सुरू करण्याची मागणी संबंधित मंत्र्यांकडे केली आहे. 

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती (Bullock cart race)पार पडल्या. त्यानंतर दावडी निमगावच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीची बारी भरवण्यात आली होती. यामध्ये एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe)यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला. बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी अमोल कोल्हेंनी सातत्याने पाठपुरावा केला. आता, बैलगाडा शर्यंतींच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात याव्यात, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

''बैलगाडा शर्यत हा राज्याच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळं 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे'च्या धर्तीवर शासनामार्फत 'महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत' आयोजित करण्याची विनंती पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांच्याकडे केली'', अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. यावेळी उपसभापती नरहरी झिरवळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे व आमदार सरोज अहिरे उपस्थित होते. तर, शिरूरचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते, आमदार सुनिल शेळके व आमदार अतुल बेणके हेही याबाबत पाठपुरावा करत आहेत, असेही पवार यांनी सांगितले. 

7 वर्षानंतर बैलगाडा शर्यत सुरू

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्याआधीच्या सुनावणीवेळी इतर राज्यांना याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता, या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु झाल्या आहेत.
 

Web Title: Rohit Pawar: Launch 'Maharashtra Bullock Cart Saffron' Competition, Rohit Pawar's letter to Animal Husbandry Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.