मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर जास्त एक्टीव्ह असतात. आपल्या दैनिक कामकाजाची माहिती ते सोशल मीडियातून देतात. मग ते विधानभवनात असो किंवा मतदारसंघात, नेत्यांवर टीका करणं असो किंवा एखाद्या निर्णयावर मत मांडणं असो. कधी कधी कटुंबीयांसमवेत वेळ घालवल्याचंही ते सांगत असतात. रोहित पवारांनी आज मुलांना जंगलातील वाघ दाखवला. खूप दिवसांनी मुलांसमवेत वेळ घालवण्यास सवड मिळाल्याचं त्यांनी म्हटलं.
आमदार रोहित पवार यांनी आज धुलवडीनिमित्त आणि अधिवेशनाला तीन दिवसांची सुट्टी असल्याने कुटुंबासमवेत जंगल सफर केली. ''जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा आज काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली. साक्षात वाघ बघून मुलं खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही? असं विचारलं. मी त्यांना म्हणालो, "वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो. म्हणूनच आपणही वाघासारखंच रहायचं असतं आणि प्रामाणिकपणे काम करताना कोण काय म्हणतंय याकडं ढुंकूनही बघायचं नसतं. हत्ती सुद्धा रस्त्याने जात असताना आजूबाजूला ओरडणाऱ्यांकडं लक्ष देत नसतो.", असे उत्तर रोहित पवार यांनी मुलांना दिलं. त्यावर, मुलांनीही प्रतिप्रश्न केला.
महाराष्ट्रही असाच आहे ना बाबा...? असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांच्या मुलांनी जंगलातील वाघ पाहिल्यानंतर केला. आमदार पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, आज मुलांसमवेतचा घडलेला हा प्रसंगही त्यांनी शब्दबद्ध करून सांगितला आहे.