युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 08:15 AM2019-06-14T08:15:38+5:302019-06-14T08:21:33+5:30
ठाकरे आणि पवार घराण्यातील ऋणानुबंध नवीन पिढीही जपताना पाहायला मिळत आहे.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्वाचं केंद्रबिंदू असलेले घराणं म्हणजे ठाकरे आणि पवार. याच घराण्यातील युवापिढी नव्या दमाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उतरताना चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांची गुरुवारी मुंबईत भेट झाली. या भेटीमध्ये रोहित पवारांनी अमित यांना फुटबॉल स्पर्धेचे निमंत्रण दिलं.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते उघडपणे राज ठाकरेंचं कौतुक करताना दिसतात. अशातच लोकसभा निवडणुकीत मनसे आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा सुरु झाली. अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी भाजपाविरोधात प्रचार करुन राज्यात निवडणुकीच्या वातावरणात रंगत आणली होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांना जवळ करण्यासाठी आघाडी इच्छुक आहे. ठाकरे आणि पवार घराण्यातील ऋणानुबंध नवीन पिढीही जपताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील फिनीक्स मॉलमध्ये रोहित पवार आणि अमित ठाकरेंची भेट झाली
या भेटीबाबत अमित ठाकरेंनी सांगितले की, 'सृजन' या संस्थे मार्फत विविध क्षेत्रात चालू असलेल्या कामांची रोहित पवारांनी माहिती दिली. समाजहितासाठी सुरु असलेल्या त्यांच्या या कार्याला माझा नेहमीच पाठींबा असेल.आजचे तरुण कार्यकर्ते आणि राजकारण या विषयावर देखील आम्ही प्रदिर्घ चर्चा केली. राजकारणात तरुण कार्यकर्त्यांना योग्य दिशा मिळावी व एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा उंचावला जावा यासाठी आम्ही नक्कीच एकत्र काम करू असा विश्वास अमित ठाकरेंनी व्यक्त केला तसेच 'सृजन फुटबॉल' या स्पर्धेचे येत्या ऑगस्ट मधे आयोजन करण्यात आले आहे त्याचे निमंत्रण रोहित पवार यांनी दिले आणि मी ते स्वीकारले आहे असं त्यांनी सांगितले.
तर रोहित पवार यांनी सांगितले की, अमित ठाकरे यांची भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले , ते त्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले. फुटबॉल हा अमित ठाकरे यांचा आवडीचा खेळ असून ते स्वतः फुटबॉलचे चांगले खेळाडू देखील आहेत. फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली
दरम्यान पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते जे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेविरुद्ध बाजू मांडत असतात त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी करण्याची गरज असलेल्या उपायांवर चर्चा झाली. युवक म्हणून पक्षबांधणीचे काम करत असताना आम्हाला या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. योग्य विचारांवर चालणाऱ्या , या विचारांचे समर्थन करणाऱ्या अशा तरुणांमागे आम्ही नेहमीच खंबीरपणे उभा असणार असल्याचं रोहित पवार आणि अमित ठाकरेंनी सांगितले.