Join us

‘घर जाना हैं’... स्थलांतरितांच्या मदतीला धावणाऱ्या सोनू सूदच्या घरी जाऊन रोहित पवारांनी केलं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 3:31 PM

सोनू सूदच्या या कामगिरीमुळे भारावून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी त्याची सदिच्छा भेट घेतली.

ठळक मुद्देकोरोना संकट काळात सोनू सूदने हजारो विद्यार्थी आणि मुजरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मोठी मदत केली. सोनू सूद आणि त्याची टीम यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

मुंबई : कोरोना संकट काळात स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी जाण्यासाठी मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचे देशभरातून कौतुक होत आहे. यातच सोनू सूदच्या या कामगिरीमुळे भारावून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी त्याची सदिच्छा भेट घेतली.

‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी माहिती रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.

रोहित पवार यांच्या ट्विटला सोनू सूदने रिट्विट करत आभार व्यक्त केले आहे. यामध्ये “तुम्हाला भेटून आनंद झाला भाऊ. चांगले काम चालू ठेवा. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. प्रत्येक स्थलांतरितासाठी उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटची स्थलांतरित व्यक्ती घरी पोहचेपर्यंत मी परिश्रम घेत राहीन” असे सोनू सूदने म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना संकट काळात सोनू सूदने हजारो विद्यार्थी आणि मुजरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मोठी मदत केली. सोनू सूद आणि त्याची टीम यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. याचबरोबर, या काळात जवळपास 40 हजार जणांच्या रोजच्या जेवणाचीही व्यवस्था त्याच्याकडून केल्याची माहिती आहे. 

विशेष म्हणजे, सोनू सूदने घरी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या स्थलांतरितांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला त्याने फक्त बसने मजुरांना घरी पाठविले. मात्र आता परजिल्ह्यात किंवा परराज्यातील स्तलांतरित व्यक्तींना ट्रेन आणि विमानाच्या माध्यमातूनही घरी पोहोचवत आहे. दरम्यान, सोनू सूदच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  

टॅग्स :सोनू सूदरोहित पवारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईराष्ट्रवादी काँग्रेस