मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होणार असून त्यात जर काही तथ्य आढळले तर या चौकशीचे धागे रोहित पवार यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त झळकताच भाजप नेते आणि ईडीच्या कारवाईचे नेहमीच ट्विटरवरुन अपडेट देणारे मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटचा रोख हा रोहित पवार यांच्याकडेच असल्याचं दिसून येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन २००६ ते २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेन्द्र पवार हे देखील या कंपनीमध्ये सन २००६ ते २००९ या कालावधीमध्ये संचालक होते. तसेच, या कंपनीशी येस बँक-डिएचएफएल घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले राकेश वाधवान व सारंग वाधवान यांचा देखील अत्यंत जवळून संबंध असल्याचे समजते. मात्र, वाधवान बंधूंचे नाव येस बँक-डिएचएफएल घोटाळ्यात पुढे आल्यानंतर रोहित पवार यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या बारामती एग्रोसंदर्भात ट्विट करत मोहित कंबोज यांनी लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता ईडीच्या चौकशीत येणार असल्याचं विधान केलं होतं. तसेच, यासंदर्भात केस स्टडी सुरू असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. आज सकाळी ट्विट करुन केस स्टडी जारी है... असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांना जय श्रीराम म्हणत डिवचले होते. आता, रोहित पवार यांच्यासंदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये झळकताच कंबोज यांनी आणखी एक सूचक ट्विट केलं आहे.
लगाम दिखती नही है, लेकिन जबान पे होनी चाहिएबिना बात के उलझो गे तो तैयार रहो फिरये सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है दोस्त, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. कंबोज यांच्या ट्विटचा रोख रोहित पवार यांच्याकडेच असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादीच्या गोटात ईडीचीच चर्चा सुरू झाली आहे.