...की घर कब आओगे, रोहित पवारांनी SRPF जवानांची समस्या गृहमंत्र्यांपुढे मांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:57 AM2020-01-08T10:57:31+5:302020-01-08T10:58:31+5:30
राज्य राखीव दलात 10 वर्षे सेवा केल्यानंतर या जवानांची बदली जिल्हा पोलीस दलात करण्यात येत होती.
मुंबई - कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नवनिर्वाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन एसआरपीएफ जवानांच्या मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी)10 वर्षे सेवा झाल्यानंतर या जवानांना जिल्हा पोलीस दलात बदली करुन घेता यावी, अशी मागणी रोहित यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही जवानांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य राखीव दलात 10 वर्षे सेवा केल्यानंतर या जवानांची बदली जिल्हा पोलीस दलात करण्यात येत होती. पण, ऑक्टोबर 2016 मध्ये या नियमांत बदल करुन जिल्हा पोलीस दलात बदली करुन घेण्यासाठी 'एसआरपी'मध्ये 15 वर्षे सेवा करण्याची अट घालण्यात आली. वास्तविक 'एसआरपी'मध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील मुले भरती होत असतात. त्यानंतर नक्षल भागात, निवडणुकीच्या वेळी, दंगलग्रस्त भागात खडतर परिस्थितीत त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचं जोखमीचं काम करावं लागतं.
अगदी सहा-सहा महिने कुटुंबापासून हे जवान दूर राहतात. एवढंच नाही तर स्वतःच्या जिल्ह्यात येण्यासाठीही त्यांना 20-25 वर्षे वाट पहावी लागते. त्यामुळे 15 वर्षे सेवेची अट रद्द करुन पूर्वीप्रमाणे 10 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी काही जवानांनी रोहित पवार यांच्याकडे केली होती. जवानांची ही मागणी रोहित यांनी गृहमंत्री मा. अनिल देशमुख यांना भेटून त्यांच्या कानावर घातली. तसे, पत्रही गृहमंत्र्यांना दिले. त्यामुळे या जवानांना किमान दहा-बारा वर्षांनी का होईना आपल्या कुटुंबासोबत राहून सेवा बजावता येईल, असे रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन सांगितले आहे.
जवानांच्या सेवाबदलीचा हा प्रश्न योग्य पद्धतीने कसा मार्गी लावता येईल, याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही प्रयत्नशील आहेत. तसेच या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं आश्वासन मा. गृहमंत्री महोदयांनी दिलं, त्यामुळं याबाबत लवकरच योग्य निर्णय होईल असा मला विश्वास आहे, असे पवार यांनी सांगितले.