मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बुधवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी तब्बल १२ तास चौकशी केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते ईडीच्या बॅलॉर्ड पीअर येथील कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर रात्री सव्वादहाच्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार बाहेर येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांना खांद्यावर उचलून घेतले. दिवसभर शेकडो कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते. १ फेब्रुवारी रोजी त्यांना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. या प्रकरणी ५ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती.
मी ईडीला सहकार्य करत होतो आणि पुढेही करत राहणार. १२ तास चौकशी चालू होती, अनेक लोक थकतात, पण मी तिथे बसलो होतो तेव्हा तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत होता, त्यातून मला प्रेरणा मिळत होती. आपला कार्यकर्ता जेव्हा अडचणीत येतो तेव्हा पवार साहेब इथे येतात. ते संधी देतात आणि कार्यकर्ता जेव्हा अडचणीत येतो तेव्हा बाप म्हणून ते पाठीशी उभे राहतात. - रोहित पवार (ईडी चौकशीनंतर कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना)
नेमके प्रकरण काय?
प्राप्त माहितीनुसार, कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते. लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता व त्यावेळी केवळ ५० कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी जी प्राथमिक पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती ती रक्कम त्या कंपनीने बारामती ॲग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. बारामती ॲग्रोने कन्नड कारखान्याच्या खरेदीसाठी जी रक्कम दिली ती रक्कम बारामती ॲग्रोने विविध बँकांतून स्वतःच्या कंपनीच्या खेळत्या भांडवलासाठी घेतली होती. मात्र, त्याचा वापर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीसाठी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.