Rohit Pawar: ... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:14 PM2022-04-18T13:14:19+5:302022-04-18T13:14:34+5:30
१२ स्फोट झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी १३ स्फोट झाले असं धडधडीत असत्य कथन केलं.
मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर जयंतीचं निमित्त साधत शरद पवारांच्या विरोधात ट्विटरवरुन हल्लाबोल केला होता. शरद पवार हे कसे जातीयवादी आहेत? त्यांनी इशरत जहाँला कसं निष्पाप ठरवलं होतं. शरद पवारांनी १९९३ ला १२ बॉम्बस्फोट झालेले असताना खोटं सांगून १३ बॉम्बस्फोट झाले असं का सांगितलं? हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? याचा संदर्भ देत त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. फडणवीसांच्या ट्विटर हल्ल्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
१२ मार्च १९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. १२ स्फोट झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी १३ स्फोट झाले असं धडधडीत असत्य कथन केलं. १२ ठिकाणी जे स्फोट झाले ती सगळी हिंदू लोकवस्तीतली ठिकाणं होती. मात्र, शरद पवारांनी १३ वा ब्लास्ट हा मुस्लिम भागात झाल्याचं खोटं सांगितलं असा आरोप फडणवीस यांनी एका बातमीचा संदर्भ देत केला होता. त्यावरुन, रोहित पवार यांनी पलटवार करताना, ही सत्तेच्या लालसेपोटी होत असेलील तडफड असल्याचं म्हटलंय.
''आदरणीय शरद पवार खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे. साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता. राज्यात दंगल भडकवण्याच्या ISI च्या प्रयत्नांना उधळून लावत शरद पवार यांनी तेंव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. पण, आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना?,'' असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.
होय!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022
आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे!
साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता. pic.twitter.com/kGS3UnLd2V
तसेच, १९९३ सालच्या मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्या. श्रीकृष्ण आयोगानेही आदरणीय शरद पवारांच्या खोटं बोलण्याची विशेष दखल घेत 'This is the example of statesmanship' अशा शब्दांत वाखाणणी केली. होय! म्हणूनच शरद पवार साहेबांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे, असे एकामागून एक ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. रोहित पवार यांनी या ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात टिका केली आहे.
सत्ता गेल्याने विरोधकांची अधिक तडफड
राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप करून ६ दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सत्तेच्या लालसेपायी शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही, अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत, अशा शब्दात रोहित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत!, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
"मी विरोधी पक्षनेत्याची ट्विट एँजॉय करतो" असं म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यात विषय संपवला. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत विनोदी आरोप केले आहेत. मी खोटं बोलल्याचं ते म्हणाले तो आरोप तर हास्यास्पद आहे. १३ वा बॉम्बस्फोट झाल्याचं मी सांगितलं हे शंभर टक्के खरं आहे. बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी त्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी त्यात जे मटेरियल वापरलं गेलं होतं ते कराचीत तयार झालं होतं हे मला माहित होतं. आपल्या शेजारचा देश हिंदू मुस्लिम समाजातलं ऐक्य बिघडवून त्यांना लढवू इच्छितो हे मला लक्षात आलं होतं. त्यामुळे १३ वं ठिकाण मोहम्मद अली रोड हे सांगितलं त्यामुळे जातीय दंगली झाल्या नाहीत हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र आले. हिंदू आणि मुस्लिम ऐक्य रहावं म्हणून ते बोललो. ज्यांना तारतम्य कळत नाही त्यांनी विधानं केली तर त्यांना गांभीर्याने घेऊ नये.