मुंबई - देशाच्या उद्योग क्षेत्रात टाटा उद्योग समुहाचं मोठं योगदान आहे. अगदी मिठापासून ते मोठ-मोठ्या गाड्या आणि विमानसेवेपर्यंत टाटाने उद्योग क्षेत्रात जाळं विनलं आहे. सर्वसामान्यांना परवडणारी नॅनोची निर्मित्ती असो किंवा देश का नमक म्हणत आयोडिनयुक्त मीठ पुरविण्यापर्यंतची कसरत असो, टाटा उद्योग समुहाने उद्योगासमवेत देशप्रेम आणि देशातील नागरिकांचा विचार केलाय. त्यामुळेच, टाटांशी सर्वच भारतीयांचं एक आपुलकीचं नातं आहे. आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट करत टाटां समुहाचं योगदान व्यक्त केलंय.
''समाजकार्यात अग्रेसर आणि देश उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या ‘टाटा उद्योग समूहा’बाबत आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. टाटा समुहाने १९२० साली बनवलेला वाफेवर चालणार रोड रोलर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बघायला मिळाला. तो पाहून माझं मन काही क्षण भूतकाळात गेलं. टाटा उद्योग समुहाचं एक विकास शिल्प म्हणून या रोलरकडं पहावं लागेल. आज देशात सर्वाधिक ई-व्हेईकल बनवणाऱ्या 'टाटा मोटर्स’च्या प्रेरणादायी प्रवासाचा एक साक्षीदार असलेल्या या रोलरसोबत मी फोटो घेतला,'' अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विट करुन दिली.
आमदार रोहित पवार हे आपल्या कुटुंबीयांसमेवत ताडोबा अभयारण्यात गेले होते. आपल्या मुलांना वाघ दाखविण्यासाठी वेळ काढून ते पर्यटनास गेल्याचे त्यांनीच सोशल मीडियातून सांगितले. याच दौऱ्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ठेवण्यात आलेला हा १९२० सालचा वाफेवर चालणारा रोड लोडर पाहून रोहित पवार भूतकाळात रमले. तर, या जुन्या पण इतिहासाची साक्ष देणाऱ्या रोड रोलडरसह फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.