Rohit Pawar On Modi Teleprompter Issue: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेच्या दावोस अजेंडा बैठकीत सहभागी झाले होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. टेलिप्रॉम्प्टर थांबल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले नाहीत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यातच मोदी जागतिक परिषदेत टेलिप्रॉम्प्टरशिवाय बोलू शकत नाहीत अशी खिल्ली नेटिझन्सकडून उडवली जाऊ लागली आहे.
सोशल मीडियात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनीही या वादात उडी घेतली आहे. पण रोहित पवार यांनी मोदींवर यावेळी कोणतीही टीका न करता पंतप्रधानांची बाजू घेतली आहे. पंतप्रधानांची खिल्ली उडवणं चुकीचं आहे, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.
"इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाइन बैठकीत काल बोलत असताना Teleprompter बंद बडल्यानं पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. अनेकजण याबाबत खिल्ली उडवत आहेत. पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे", असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?करोनाच्या संकटामुळे पंतप्रधान मोदी दाओस अजेंडा परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या परिषदेत पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. या संबोधनादरम्यान ते बोलता-बोलता थांबले. संबोधनावेळी टेलिप्रॉम्प्टर अचानक थांबल्याने पंतप्रधान मोदींना पुढे बोलता आलं नाही, असा आरोप आहे. यावरून काँग्रेसने आणि पक्षाचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.