मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. MIDC च्या मंजुरीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी चक्क पावसात भिजत आंदोलनही केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, स्वत: मंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्न सोडवला जाईल, आंदोलन मागे घ्या असे आवाहन केले होते. आता, पुन्हा एकदा रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. विधानसभेत येताना आज त्यांनी चक्क MIDC आणि मुद्द्याचं बोला... असं लिहिलेलं जॅकेट परिधान केल्याचं दिसून आलं.
आमदार पवार यांनी उद्योगमंत्र्यांसमवेतच विधानसभेत एंट्री केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, त्यांच्या अंगावर हाच नाविण्यपूर्ण जॅकेट होता. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे माहिती नाही. पण, रोहित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत दोघेही विधानसभेकडे येताना हसत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत आमदार रोहित पवारांनी पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. तसेच, हा टी-शर्ट मला माझ्या मित्राने भेट दिला आहे. मी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील एमआयडीसीच्या मुद्द्यावरुन विधानसभेत आवाज उठवत आहे. त्यामुळे, मित्राने हा टी शर्ट भेट दिला असून हा केवळ तुझ्या एका मतदारसंघातील प्रश्न नसून तो महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रश्न आहे. त्यामुळे, मित्राने या टी-शर्टच्या माध्यमातून तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आज तो टी-शर्ट घालून मी विधानसभेत आलो.
उद्योगमंत्र्यांनाही माझा हा टी शर्ट आवडला. पण, त्यांच्यामागे राजकीय दबाव असल्याचं अप्रत्यक्षरित्या दिसून येतं. मात्र, हजारो युवकांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने राजकीय दबाव झुगारुन ते एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षाही आमदार पवार यांनी व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर पूर्णपणे MIDC व विविध मुद्द्यावरुन लक्ष्य केंद्रीत करण्यात आल्याचा कंटेंट लिहिण्यात आलाय. टी शर्टच्या पुढील बाजूस MIDC तसेच मुद्दयाचं बोला, असं लिहिलंय. तर, ''ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया, आणि फक्त मुद्दयाचं बोलूया!'', असं टी शर्टच्या पाठिमागील बाजूस लिहिण्यात आलं आहे.