नियम पाळू-कोरोना टाळू, कोविडच्या उद्रेकामुळे रोहित पवारांचा दौरा रद्द
By महेश गलांडे | Published: February 21, 2021 10:02 PM2021-02-21T22:02:57+5:302021-02-21T22:03:57+5:30
आमदार रोहित पवार यांचा सोमवारी नियोजित असा सातारा दौरा होता. मात्र, कोरोना उद्रेकमुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनामुळे गर्दी टाळण्यासाठी मी सातारा दौरा रद्द करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलंय.
मुंबई - देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. (increase in coronavirus patients in Maharashtra) त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी, वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात येत असल्याचे बजावले. तसेच, कोरोनापासून बचावासाठी शिस्त पाळणं बंधनकारक असून आता आपण आणखी एक मोहिम राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितंलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आमदार रोहित पवार यांनी आपला सातारा दौरा रद्द केला आहे.
आमदार रोहित पवार यांचा सोमवारी नियोजित असा सातारा दौरा होता. मात्र, कोरोना उद्रेकमुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनामुळे गर्दी टाळण्यासाठी मी सातारा दौरा रद्द करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानुसार उद्याचा सातारा दौरा स्थगित केला आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या नियोजित सर्व ठिकाणी मी निश्चित भेट देईन! तूर्तास नियम पाळू, कोरोना टाळू!, असे ट्विट रोहित पवार यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांनीही यापुढे काही दिवस दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन मंत्र्यांना केलंय. त्याच आवाहनाला प्रतिसाद देत, रोहित पवार यांनी आपला दौरा रद्द केलाय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी म्हणून मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब आणि @AjitPawarSpeaks दादांच्या आवाहनानुसार उद्याचा सातारा दौरा स्थगित केला आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या नियोजित सर्व ठिकाणी मी निश्चित भेट देईन!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 21, 2021
तूर्तास नियम पाळू, कोरोना टाळू! https://t.co/ueFo34YLu0
मास्क हीच ढाल
स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नियोजित वेळेनुसार नागरिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचं औषध तेव्हाही नव्हतं, आजही नाही. केवळ दिलासा तो लसीचा. सध्या लसीकरण सुरू झालं असून 9 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय. आणखीन दोन-तीन कंपन्या लस देणार आहेत, त्याही लस आपल्याला लवकरच उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी मुख्यमंत्री म्हणून शिवनेरीवर गेलो, हे माझं भाग्यच. यावेळी, शिवनेरीवर गर्दी कमी होती, पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली. वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल हवी. पण, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना तलवार नाही, पण मास्क ही आपली ढाल आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
मीच जबाबदार
पक्ष वाढवुया, कोरोना नको वाढवुया असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करणाऱ्यांनाही विनाकारण आंदोलन न करण्याचं सूचवलं. तसेच, पुढील काही काळासाठी राज्यात मिरवणुका, मोर्चे, यात्रा आणि आंदोलनांना बंदी घालण्यात येत असल्याची घोषणाच केली. एका यंत्रणेवर ताण टाकायचा आणि आपण बेभान वागायचं, हा त्या एका यंत्रणेवर केलेला अमानुषपणा नाही का, सगळ्यांना आयुष्य जगालया पाहिजेय, असेही ते म्हणाले. तसेच, माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार... प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं म्हणजेच होय मीच जबाबदार. आपली जी बंधने आहेत, घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळालयाच हवं. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मी एक सूचना केली. आपल्याकडे 24 तास असतात, या 24 तासांची नीट विभागणी केल्यास नियंत्रण ठेवता येईल. वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मीच जबाबदार... असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.