मुंबई : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस चांगलेच चिघळत चालले आहे. मुंबईत या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असून गुरुवारी विविध ठिकाणी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनामध्ये मुंबई विद्यापीठातील विद्यार्थीही सहभागी झाले असून त्यांनी शुक्रवारी विद्यापीठ बंदची हाक दिली आहे.वेमुला याच्या आत्महत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळत असून त्याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी निदर्शने केली. काँग्रेस, भीमशक्ती संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसने पनवेल-सायन मार्गावर सकाळी ११ वाजता पांजरापोळ फ्री वे येथे जोरदार निदर्शने केली. रोहितची आत्महत्या नसून त्याचा तेथील जातीयवाद्यांनी बळी घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी, विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, केंद्रीय मंत्री बंडारू दतात्रेय यांच्यावर अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना पदावरून दूर करावे आणि जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी या वेळी दिला.पांजरापोळ चौकात जमावाने मंत्रालयाकडे येणारा पूर्व मुक्त मार्ग आणि सायन-पनवेल महामार्ग अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ अडवून धरल्याने दोन्ही महामार्गांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी वरळी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी अहिर यांनी रोहितच्या आत्महत्येला भाजपाची जातीयवादी मानसिकता जबाबदार असून सत्ताधाऱ्यांनी आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपली कुजकट मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगत या प्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ मुंबईतील आंबेडकरी अनुयायांनी गुरुवारी सायंकाळी सीएसटी रेल्वे स्थानकासमोर मूक निदर्शने केली. आझाद मैदानापासून सुरू झालेली रांग मेट्रो थिएटरपर्यंत गेली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या निषेधाचे फलक हातात घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. मुंबईतील तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर रोहित वेमुला जस्टीस फोरमची स्थापना केली आहे. तसेच गुरुवारी सायंकाळी सीएसटीला जमण्याचे आवाहन सोशल माध्यमांद्वारे केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सायंकाळी हजारो युवक सीएसटी स्थानकात जमा झाले. त्यामध्ये तरुणींची संख्या मोठी होती. अभाविपवर बंदी घाला, रोहितला न्याय द्या, आम्ही पाचपेक्षा अधिक आहोत, अशी घोषवाक्ये लिहिलेले विविध भाषांमधील पोस्टर्स लक्ष वेधून घेत होते. (प्रतिनिधी)रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ बंदची हाक दिली आहे. सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मुंबई विद्यापीठ विद्यार्थी फ्रंटची स्थापना केली आहे. या फ्रंटमार्फत शुक्रवारी सकाळी ११ वाजता कलिना कॅम्पसमधील मेन गेटसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.दादरमध्ये निषेध रॅलीया प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी मी बुद्धिस्ट फाउंडेशन या संस्थेमार्फत शुक्रवारी वीर कोतवाल उद्यान ते चैत्यभूमीपर्यंत निषेध रॅली काढण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. विश्वास काश्यप यांनी सांगितले.वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चातसेच कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी २ वाजता उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रकरणाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात येणार आहे.