Join us

रॉकेल कपातीचा उडणार भडका

By admin | Published: January 19, 2015 12:20 AM

राज्य शासनाने रॉकेल पुरवठ्यामध्ये तब्बल ४२ टक्के कपात केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची गैरसोय होवू लागली आहे.

नवी मुंबई : राज्य शासनाने रॉकेल पुरवठ्यामध्ये तब्बल ४२ टक्के कपात केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची गैरसोय होवू लागली आहे. पूर्ववत रॉकेल पुरवठा व्हावा यासाठी सामाजिक संस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. चांगले दिवस येणार अशी जाहिरात करून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या रॉकेलमध्ये मोठ्याप्रमाणात कपात केली आहे. जानेवारी महिन्यापासून रॉकेल कमी मिळू लागल्यामुळे स्वयंपाक करायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शिधावाटप पत्रिकेवर एका व्यक्तीचे नाव असेल तर त्यांना फक्त एक लिटरच रॉकेल मिळत आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिक कुटुंबात असतील तर जास्तीत जास्त पाच लिटर रॉकेल मिळत आहे. मिळणाऱ्या रॉकेलवर महिनाभर स्वयंपाक करणे अशक्य होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. नवी मुंबईमधील दिघा ते सीबीडीपर्यंत जवळपास ५० हजार झोपडपट्टीधारक आहेत. गावठाणांमध्येही सर्वसामान्य नागरिक रहात आहेत. शिधापत्रिकेवर रॉकेल घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकांना गॅस घेणे परवडत नाही. झोपडपट्टी परिसरात गॅस सुलभपणे पोहचविण्याची यंत्रणाही नाही. काही नागरिक रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करत आहेत. या सर्वांसाठी रॉकेल अत्यंत आवश्यक आहे. परंतु शासनाच्या सुधारित धोरणामुळे अनेकांना काटकसर करावी लागणार आहे. कपातीमुळे काळाबाजार वाढण्याची शक्यता आहे. तुर्भे नाक्यावर एक लिटर रॉकेलसाठी ७० ते ८० रूपये मोजावे लागत आहेत. (प्रतिनिधी)