Join us

व्यापार, उद्योग क्षेत्रांना संकटकाळी आधार देण्याची सरकारची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:06 AM

रेल्वेमंत्री; कोरोना संसर्ग रोखण्यास सर्वोच्च प्राधान्यलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊन आदी निर्बंधांमुळे व्यापार-उद्योग क्षेत्र ...

रेल्वेमंत्री; कोरोना संसर्ग रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊन आदी निर्बंधांमुळे व्यापार-उद्योग क्षेत्र अडचणीत असल्याची केंद्र सरकारला पूर्ण जाणीव असून, व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अडचणी सोडवून सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र आता पहिले प्राधान्य कोरोना संसर्ग रोखणे व आरोग्य सुविधा वाढविण्याला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स फेडरेशनतर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून पियूष गोयल बोलत होते. महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेच्या प्रारंभी व्यापार, उद्योग क्षेत्राच्या भूमिका मांडताना लॉकडाऊनमुळे व्यापार-उद्योग व सेवा क्षेत्र अडचणीत आल्याचे सांगून, कर्जाची पुनर्रचना, व्याजात सवलत, कमी व्याजाने कर्जपुरवठा यांचा समावेश असलेल्या पॅकेजची मागणी करण्यात आली. तसेच जीएसटी आयकर विवरणपत्रे व कर भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.

ललित गांधी यांनी यावेळी मुंबई-कोल्हापूर सुपर फास्ट रेल्वे, पुणे-कोल्हापूर शटल सर्व्हिस या दोन नवीन सेवांची मागणी करून यापूर्वी मंजूर केलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे कामे सुरू करण्याची मागणी केली.

गोयल म्हणाले की, केंद्र सरकार सध्या पूर्ण ताकदीने आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्य करत असून, व्यापार उद्योग क्षेत्रानेही सहकार्य करावे. शिवाय मास्क आणि लसीकरण यास गांभीयाने घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालयाकडून नवी सेवा देतानाच पूर्वीचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य आहे. महाराष्ट्र सरकारशी सातत्याने संपर्कात आहोत. जमीन संपादन, आर्थिक सहभागाची पूर्तता लवकर घेऊन कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करू. व्यापारी-उद्योगांना लॉकडाऊन काळात येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयातर्फे वॉर रूम तयार करण्यात आली असून, या माध्यमातून सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधून तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही गोयल म्हणाले.

........................