सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात आमचे पोलीस, स्वच्छता कर्मचारी, तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालत सेवा बजावली. या सगळ्याची इत्यंभूत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारांनी केले. जी बाब खरच प्रशंसनीय आहे, या भाषेत सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांचे रविवारी कौतुक केले.
मालाड पश्चिमच्या साई पेलेस ग्रँड या ठिकाणी पत्रकार विकास संघाच्या १२व्या स्थापना दिवस निमित्ताने ‘एक्सीलेंस’ आणि ‘ज्युरी’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी पाटील बोलत होते. सरकारच्या प्रत्येक धोरणावर पत्रकारांची बारीक नजर असते. ते चुका लक्षात आणून देत असल्याने सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यात मदत होते. कोरोनासारख्या जागतिक संकटातही जिवाची पर्वा न करता, त्यांनी जबाबदारी पार पाडली, जे कौतुकास्पद आहे, असे पाटील यावेळी म्हणाले. प्रिंट, तसेच चॅनलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, पालकमंत्री अस्लम शेख, आमदार क्विद्या ठाकूर, भाजपा प्रवक्ता प्रेम शुक्ल, काँग्रेस प्रवक्ता रामकिशोर त्रिवेदी, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते.