Join us

भाडे कमी न करण्याची श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 7:54 PM

५०० रुपये तिकिट दर केल्यास नाट्यगृहाचे भाडे दीडपट आकारण्याच्या निर्णयाविरोधात मागच्या आठवड्यात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने १ जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये २३ नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका घेतली.

मुंबई - ५०० रुपये तिकिट आकारल्यास दीडपट भाडे घेण्याच्या निर्णयाविरोधात काही निर्मात्यांनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये प्रयोग न करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेला हा नियम मागे न घेण्याचा निर्णय ट्रस्टच्या ८०व्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

५०० रुपये तिकिट दर केल्यास नाट्यगृहाचे भाडे दीडपट आकारण्याच्या निर्णयाविरोधात मागच्या आठवड्यात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने १ जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये २३ नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने शिवाजी मंदिरमधील प्रयोग थांबणार नसल्याचे जाहिर केले. या दरम्यान राजर्षी शाहू सभागृहामध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला सरचिटणीस अण्णा तथा चंद्रकांत सावंत, बजरंग चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत प्रामुख्याने तीन निर्णय घेण्यात आले. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या मागणीनुसार नाट्यसंस्थेने ५०० रुपये तिकीट दर लावल्यास नाट्यगृहाचे भाडे दीडपट आकारले जाण्याचा निर्णय कायम ठेवला. नाट्य निर्माता संघाच्या मागणीनुसार संगीत व प्रायोगिक नाटकांसाठी नाट्यगृहाच्या भाड्यात २५ टक्के सवलत देण्यात येईल. मार्च २०२४पासून दर सोमवार व गुरुवारी संध्याकाळचे सत्र प्रायोगिक तसेच हौशी नाटकांसाठी विनामूल्य देण्यात येईल. याखेरीज आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. जिजामाता मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमासाठी निधी वाढवण्यात आला आहे.

अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, श्री शिवाजी मंदिरप्रमाणे सिंधुदुर्गातील ओरोस येथे मंडळाच्या २० एकर जागेवर जिजामाता सेवा केंद्र सुरू असून, तिथे खेड्यांतील रुग्णांची सेवा केली जाते. नाटक, विवाह सोहळे, सामाजिक-राजकीय सभांसाठी ६०० आसनक्षमतेच्या सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मंडळ विविध प्रकारे लोक व कला सेवा करीत असताना काही नाट्य निर्मात्यांनी नाट्यगृहाची बदनामी करण्याचा सुरू केलेला खोडसाळपणा थांबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :मुंबई