Join us

वृक्ष छाटणी संवादाची भूमिका; पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींच्या इशाऱ्यानंतर निर्णय

By जयंत होवाळ | Published: May 17, 2024 7:07 PM

पालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर झाडांच्या वाढलेल्या अतिरिक्त फांद्यांची छाटणी केली जाते.

मुंबई : वृक्ष छाटणी करताना पालिकेचे कर्मचारी वाट्टेल त्या पद्धतीने छाटणी करतात, त्यामुळे वृक्ष विद्रुप होतात, छाटणी करताना पक्षांची घरटी विचारात घेतली जात नाहीत. त्यामुळे छाटणी करताना आमच्याही चर्चा करावी, अन्यथा छाटणी करू देणार नाही, असा इशारा पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींनी काहीच दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे वाद टाळण्यासाठी पालिकेने आवश्यक त्या ठिकाणी संवादाची भूमिका घेतली आहे. परिणामी छाटणीची कामे सुरळीत सुरु आहेत.

पालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर झाडांच्या वाढलेल्या अतिरिक्त फांद्यांची छाटणी केली जाते. यंदा मात्र पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींनी या छाटणीस आक्षेप घेतला होता. पालिकेचे कामगार अतिरिक्त फांद्या तोडताना सरसकट कुऱ्हाड चालवतात. छाटणीची ही पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप आहे. वाटेल त्या पद्धतीने फांद्या तोडल्याने झाड विद्रुप दिसते, नंतर वाढ होताना फांद्या विचित्र तऱ्हेने वाढतात. त्यामुळे झाडाचा डौलदारपण नाहीसा होतो. काही झाडांवर पक्षांनी घरटी बांधलेली असतात, काही घरट्यांमध्ये अंडी घातलेली असतात. ही बाब कामगार विचारात घेत नाहीत. फांद्या कापताना घरटी खाली रस्त्यावर पडतात. अनेकवेळा कारण नसतानाही फांद्या तोडल्या जातात, असे पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींचे म्हणणे होते.

काळजीपूर्वक छाटणी न केल्यास छाटणीस विरोध करू असा इशारा त्यांनी दिला होता. छाटणी करताना आमच्याशी चर्चा करा अशीही त्यांची मागणी होती. त्यामुळे वाद टाळण्यासाठी पालिकेने संवादावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी उद्यान खात्याचे अधिकारी , स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरण आणि वृक्ष प्रेमीं यांच्या उपस्थित कामे केली जात आहेत.

टॅग्स :मुंबई