मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करुन मला अडकवण्याचे प्रयत्न सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने हे सर्व सुरू आहे', असा धक्कदायक आरोप त्यांनी केला आहे. याबाबतीह मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एक अनिल देशमुख झाले तसे अनेक अनिल देशमुख होतील हा त्यांचा गैरसमज आहे. पण आम्ही हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही योग्य ती कारवाई करु,' असा इशारा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिकांच्या या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, नवाब मलिकांवर पाळत ठेवण्याइतकं त्यांचं महत्व नाही. चार दिवस टीव्हीवर दिसलात म्हणजे लोकप्रिय होत नाही, असा टोला निलेश राणे यांनी लगावला. तसेच नवाब मलिकांनी घेतलेली भूमिका, ही ड्रग माफियांना नक्कीच फायद्याची ठरली, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, अशी टीका देखील निलेश राणे यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तक्रार करणार-
अनिल देशमुख यांच्याप्रमाणे मला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे. तसे पुरावेचं माझ्या हातात लागले आहेत. काही अधिकारी लोकांना माझ्या विरुद्ध मसुदा तयार करून इमेल करत आहेत. आणि त्यांना माझ्या विरुद्ध तक्रार करायला लावत आहेत. त्यामुळे मी याविरोधात मी कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील तक्रार करणार आहे. आशा तक्रारींची चौकशी करायला लावणार आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे.