अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा; CM शिंदेंचे पुणे आयुक्तांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:38 PM2024-06-24T22:38:24+5:302024-06-24T22:38:33+5:30
CM Eknath Shinde News: पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.
CM Eknath Shinde News: ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकीत हॉटेलमध्ये तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ रविवारी समोर आला होता. या व्हिडीओवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अंमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.
पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.