एक्शनपटांच्या लाटेत हरवला रोमँटिक सिनेमा! यंदाचाही 'व्हॅलेंटाईन डे' राहणार कोरडाच

By संजय घावरे | Published: February 13, 2024 07:20 PM2024-02-13T19:20:20+5:302024-02-13T19:20:47+5:30

संगीतप्रधान प्रेमकथांनी हिंदी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवला आहे.

Romantic cinema lost in the wave of action films | एक्शनपटांच्या लाटेत हरवला रोमँटिक सिनेमा! यंदाचाही 'व्हॅलेंटाईन डे' राहणार कोरडाच

एक्शनपटांच्या लाटेत हरवला रोमँटिक सिनेमा! यंदाचाही 'व्हॅलेंटाईन डे' राहणार कोरडाच

मुंबई - हिंदीत सध्या एक्शनपटांची चलती असून, म्युझिकल लव्हस्टोरीजची संख्या खूप कमी झाली आहे. आपल्याकडे 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर प्रेमकथा रिलीज करण्याचा ट्रेंड नसल्याने यंदाही या आठवडत्यात कोणताही मोठा रोमँटिक सिनेमा रिलीज झालेला नाही.

संगीतप्रधान प्रेमकथांनी हिंदी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवला आहे. 'मुघल-ए-आझम', 'गंगा जमुना', 'बॉबी', 'कभी कभी', 'सिलसिला',  'प्रेमरोग', 'बेताब', 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे', 'साजन', 'दीवाना', 'कुछ कुछ होता है', 'आशिकी', 'साथिया', 'जब वी मेट' आदि बऱ्याच लव्हस्टोरीजने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यात गीत-संगीताची भूमिका महत्त्वाची ठरली. अलिकडच्या काळात अशा प्रकारे यशस्वी झालेले फार कमी सिनेमे आहेत. आजच्या एक्शनच्या जमान्यात संगीतप्रधान प्रेमकथा कुठेतरी मागे पडल्या असल्याचे चित्रपट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

मागच्या वर्षी करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हा रोमँटिक फॅमिली ड्रामा रिलीज झाला. रणबीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी यात होती. १६० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने ३५६ कोटींचा व्यवसाय केला, पण हा चित्रपट क्लासिक चित्रपटांमध्ये सामील होऊ शकणार नाही. लव रंजन दिग्दर्शित 'तू झूठी मै मक्कार' या रोमँटिक ड्रामामध्ये रणबीर कपूरच्या जोडीला श्रद्धा कपूर होती. यावर १८० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, पण याने केवळ २२० कोटी कमावले.

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीच्या 'सत्यप्रेम की कथा' या रोमँटिक कॉमेडीचे बजेट ६० कोटी रुपये होते. याने ११८ कोटी रुपयांची कमाई केली. 'दोनों' या रोमँटिक ड्रामाद्वारे सनी देओलचा मुलगा राजीव आणि पूनम धिल्लोंची मुलगी पलोमा हि नवी जोडी चित्रपटसृष्टीत दाखल झाली, पण चित्रपट अपयशी ठरला. यापैकी एकही चित्रपट 'व्हॅलेंटाईन डे'च्या आठवड्यात रिलीज झालेला नाही. यंदाही यापेक्षा वेगळे चित्र नाही. मागच्या शुक्रवारी शाहिद कपूर आणि कृती सॅनोनचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आला, पण हा सायन्स फिक्शन रोमँटिक कॉमेडी आहे. 

भारतीय सिनेसृष्टीत 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर रोमँटिक सिनेमे रिलीज करण्याचा ट्रेंड नाही. मराठीतही या मुहूर्तावर फार काही केले जात नाही. फेब्रुवारीपासून परिक्षांचा काळ सुरू होत असल्यानेही व्हॅलेंटाईन डेला कोणताही मोठा रोमँटिक सिनेमा रिलीज होत नाही. 
- दिलीप ठाकूर (चित्रपट अभ्यासक)

मराठीत नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ने आठ वर्षांपूर्वी मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती कोणताही चित्रपट करू शकला नाही. २०१७मध्ये आलेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते'ने अनोखी प्रेमकथा आणि सुमधूर गीत-संगीताच्या बळावर चांगला गल्ला जमवला. 

२०२२च्या अखेरीस रिलीज झालेल्या रितेश आणि जिनिलीया देशमुख यांच्या 'वेड'मधील लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. व्हॅलेंटाईन वीकचे औचित्य साधत महेश मांजरेकरांनी 'ही अनोखी गाठ'चा ट्रेलर लाँच केला आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले ही जोडी आहे.

Web Title: Romantic cinema lost in the wave of action films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.