मुंबई : कोरोना काळातील ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी मेसर्स हायवेच्या रोमिन छेडाला अटक करण्यात आली आहे. काम वेळेत पूर्ण केले नसतानाही पूर्ण केल्याचा बनाव करत सहा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरुवारी आठ तास चौकशी केल्यानंतर शुक्रवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पेंग्विनच्या कंत्राटमुळे वादग्रस्त ठरलेल्या मेसर्स हायवे कंपनीची पात्रता नसताना देखील या कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंपनीला पालिकेची ९ रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण केले नाही तरी २०२१ मध्ये काम पूर्ण झाल्याचे दाखवून सहा कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बनावट लेटरचा वापर करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री रोमिन छेडासह संबंधित पालिका अधिकाऱ्याविरुद्ध नागपाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवत, आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
गुरुवारी रोमिन यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानुसार, ते कागदपत्रांसह कार्यालयात हजर झाले. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची ८ तास चौकशी करण्यात आली आहे. शुक्रवारी पुन्हा चौसखीसाठी बोलावण्यात आले. त्यानुसार, चौकशी अंती अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून कुणाची नावे समोर येतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.