मुंबई महापालिका नियंत्रण कक्षाचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:30 AM2017-12-06T04:30:37+5:302017-12-06T04:31:02+5:30
भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी परिसरात महापालिकेमार्फत सोयी-सुविधा पुरविण्यात येत असतात. अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी व सतर्कतेसाठी शिवाजी पार्कमध्ये बनविण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे छत मंगळवारी सकाळी कोसळले. विशेष म्हणजे या ठिकाणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून पाणी, शौचालय, न्हाणीगृह, आरोग्य सेवा अशा सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधांची माहिती व डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भातील माहिती पालिकेकडून पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध केली जाते. या पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी शिवाजी पार्क येथील पालिकेच्या नियंत्रण कक्षात करण्यात आले. या वेळी पालिका आयुक्त अजय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर, आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिंधू मसुरकर, अतिरिक्त पालिका आयुक्त आबासाहेब जºहाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मात्र, रात्रभर कोसळणाºया पावसाचे पाणी शिवाजी पार्कमधील पालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या मंडपावर साचले होते. पुस्तिकेच्या प्रकाशनाआधी मंडपावरील पाणी काढण्यात आले होते. महापौर नियंत्रण कक्षात येताच त्यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेचे प्रकाशन केल्यावर महापौर आणि मान्यवर स्टेजवरून खाली उतरताच पाण्याने भरलेले मंडपाचे छत कोसळले. नियंत्रण कक्षात काही सेकंद महापौर आणि इतर मान्यवर थांबले असते तर त्यांना या दुर्घटनेचा फटका बसण्याची शक्यता होती. ठेकेदाराने योग्य प्रकारे मंडप बांधला नसल्याने पाणी साचून हे छत कोसळल्याची नाराजी व्यक्त होत आहे.