Join us

डोक्यावरचे छप्पर गेले, उघड्यावर आला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

चेंबूरच्या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांची कहाणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चेंबूरच्या भारतनगर येथे झालेल्या दुर्घटनेच्या येथील बचावकार्य थांबविल्यानंतर सोमवारी ...

चेंबूरच्या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांची कहाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूरच्या भारतनगर येथे झालेल्या दुर्घटनेच्या येथील बचावकार्य थांबविल्यानंतर सोमवारी चिखलात अडकलेल्या वस्तू, भांडी बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेतून बचावलेल्यांपैकी अनेकांची घरे पडली आहेत. काहींची मोडकळीस आली आहेत. त्यामुळे सगळा संंसार उघड्यावर आल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिली जात आहे.

चेंबूरच्या या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५ जण जखमी आहेत. येथील रहिवासी लक्ष्मी जोगदंड म्हणाल्या, १२ वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. कालच्या घटनेत आमचे जीव वाचले; मात्र घरातले सगळे सामान वाया गेले. इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या, भांडी चेमटली आहेत. काही चिखलाखाली गेली होती. पण, आता भांडी बाहेर काढली आहेत. घर राहण्यायोग्य राहिलेले नाही, त्यामुळे संसार बाहेर उघड्यावर मांडायची वेळ आली आहे. आमची तात्पुरत्या स्वरूपात विष्णूनगर येथील म्हाडाच्या घरात राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे; पण त्यासाठी आधार कार्ड मागितले जात आहे. सर्व कागदपत्रे चिखलाखाली असल्याने ते आणायचे कुठून, हा प्रश्न पडला आहे.

काही जणांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र संरक्षक भिंतीजवळ अजून अनेक जण मृत्यूच्या छायेत राहत आहेत. सरकारने काहीतरी व्यवस्था करावी.

- संतोष ओव्हाळ, रहिवासी

या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात दगड, चिखल आणि पाणी घरात साचले आहे. राहायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. स्थानिक नगरसेविकेने सध्या राहण्याची व्यवस्था केल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

- रेखा अंगरख, रहिवासी

गर्भवती असलेल्या माझ्या सुनेला कालच्या घटनेत पोटाला मार लागला. तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार करून आता तिला आम्ही नातेवाइकांकडे ठेवले असून, आम्हीही मुलाकडे जात आहोत.

- जयश्री जाधव, रहिवासी

येथील अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. या ठिकाणच्या ३८ रहिवाशांना विष्णूनगर येथील म्हाडाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना सर्वोपरी मदत केली जात आहे.

- निधी शिंदे, स्थानिक नगरसेविका