Join us

डोक्यावरचे छप्पर गेले, आता राहायचे कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 1:43 AM

डोंगरी येथील केसरबाई इमारतीलगतची अनधिकृत इमारत मंगळवारी कोसळली.

मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारतीलगतची अनधिकृत इमारत मंगळवारी कोसळली. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला, ९ लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला दोन दिवस उलटले आहेत; तसेच येथील शोधकार्य थांबविण्यात आले आहे तरी या परिसरात अजूनही दु:खाची छाया कायम आहे. या दुर्घटनेत बळी गेलेल्यांचे नातेवाईक घटनास्थळी येत आहेत. त्यांना येथे आल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर होत आहेत.दुर्घटना घडलेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे आपल्या माणसांसोबत, डोक्यावरचे छप्परही गेले आहे. येथे राहणारे अनेक जण बेघर झाले असून आता राहायचे कुठे, हा प्रश्न रहिवाशांसमोर उभा आहे. त्यांना राहण्यासाठी सरकारकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. सध्या या रहिवाशांनी आपल्या नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे. मुले शाळेत आहेत, काही जण येथे कामाला आहेत. त्यामुळे हा परिसर सोडून दुसरीकडे राहायला जाणे या रहिवाशांना शक्य नाही. या ठिकाणी दोन दिवसांत अनेक नेते आणि अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली आहेत; परंतु जसे जसे दिवस उलटतील तसा सर्वांना या घटनेचा विसर पडेल; परंतु येथील रहिवाशांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा राहण्याचा प्रश्न. पुनर्वसन करण्यात येईल, असे नेते सांगत आहेत; पण ते कधी होईल, त्याला किती वेळ लागेल याची माहिती नाही. त्यामुळे या रहिवाशांना नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडेच राहावे लागणार आहे असे काही रहिवाशांनी सांगितले.या भागात अनेक इमारती अनधिकृत आहेत. केवळ इमारतीच नव्हेतर, इमारतीबाहेरही नियमबाह्य बांधकाम केले आहे. दुर्घटना झाली ती इमारत हे केसरबाई स्टोरेज रूम होते आणि त्यावर फक्त टेरेस होते; मात्र हे सर्व तोडून येथे १९९२ मध्ये इमारत बांधण्यात आली. येथे चारचाकी वाहनेही येत होती. आता अनेकांनी दारात अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यामुळे वाहनांना आतमध्ये येता येत नाही. शोधकार्यात, मदतकार्यात अडथळा आला. अनधिकृत बांधकाम नसते तर पीडितांना वेळेत सुखरूप बाहेर काढण्यात मदत झाली असती. येथील इमारत खाली करण्यात आली असून त्यांचे पुनर्वसन करताना नियमानुसार करावे तरच अशा दुर्घटना टळतील, असे रहिवासी अब्बास शेख यांनी सांगितले.>डोंगरी येथील ढिगारा उपसण्यासह बचावकार्याचे काम मुंबई अग्निशमन दलाने बुधवारी रात्रीच थांबवले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात घटनास्थळी एक फायर इंजीन आणि रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. दुर्घटनाग्रस्त इमारत नक्की कोणाची याबाबत पुरेशी स्पष्टता आलेली नाही.>म्हाडा आणि महापालिका या दोन्ही प्राधिकरणांनी याबाबत आपली भूमिका पुरेशी स्पष्ट केलेली नाही. परिणामी आता नेमकी कारवाई कोणावर होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. महत्त्वाचे म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा अहवाल तयार झाल्यानंतरच पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भातील पुढील कारवाई केली जाणार आहे.>डोंगरी दुर्घटनेतील ९ रुग्णांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील पाच जणांची प्रकृती स्थिर असून एकाची गंभीर आहे. याखेरीज दोन रुग्णांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.पुनर्वसनाच्या कारवाईला गती यावीयेथील इमारतींच्या पुनर्वसनाच्या फाईल टेबलांवर पडून आहेत. त्यांची कारवाई अत्यंत धिम्या गतीने सुरू असून ते काम तातडीने सुरू व्हावे. तसेच अनधिकृत बांधकाम करणाºयांना शिक्षा व्हावी तरच अशा घटनांना आळा बसेल.- मोहम्मद इफ्तिकार शेख,मोहम्मद इसराल मन्सुरीचे नातेवाईकया दुर्घनेतील पीडितांचे पुनर्वसन कराया दुर्घटनेतील पीडित बेघर झाले आहेत. त्यांना नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे राहावे लागत आहे. त्यांचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे.- सलीम शेख, अब्दुल शेख यांचा भाऊ?>‘पैसे काढून दुरुस्ती करा’डोंगरी परिसरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरातील लोकांनी पैसे गोळा करून इमारत दुरुस्ती करावी. या कामासाठी केवळ तीन लाख रुपये आमदार निधीतून देण्यात येतील, असे अमीन पटेल म्हणाल्याचे जाफर शेख यांनी सांगितले.