आमदारांच्या खोल्यांमध्ये आंघोळीसाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:42 AM2019-02-27T05:42:59+5:302019-02-27T05:43:06+5:30
एका खोलीत राहतात चार आमदार : सर्वपक्षीय सदस्यांची तीव्र नाराजी
मुंबई : मनोरा आमदार निवासातून आमदारांना काढले. त्यांच्या राहण्याची सोय नाही. दुसऱ्या आमदार निवासांमध्ये एकाच खोलीत चारचार आमदार राहतात. अधिवेशनामुळे त्यांच्या खोल्यांत कार्यकर्त्यांची गर्दी आहे. आंघोळीसाठी आमदारांना रांग लावावी लागते, अशा शब्दात सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी आमदार मनीषा चौधरी यांनी निवासाच्या गैरसोयीचा मुद्दा मांडला. धोकादायक मनोरा आमदार निवासाची इमारत पाडण्यास सुरूवात झाल्याने आमदारांची गैरसोय होत आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत २६ महिला आमदार आहेत. विधानमंडळाने आमची निवासाची गैरसोय दूर करावी यासाठी आम्ही विधानमंडळ सचिवांची भेट घेतली. निवासासाठी हॉटेलचे १८ हजार रुपये भाडे आम्हाला परवडणारे नाही. त्यामुळे महिला आमदारांची प्रधान्याने राहण्याची व्यवस्था करावी अन्यथा सरकारने भाडे द्यावे, अशी मागणी चौधरी यांनी केली.
काँगे्रसचे वीरेंद्र जगताप, शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी आकाशवाणी आमदार निवासातील गैरसोयींकडे सरकारचे लक्ष वेधले. मनोरा आमदार निवास इमारत पाडण्यास सुरूवात झाल्याने बहुतांश आमदार, कार्यकर्ते आकाशवाणी आमदार निवासात आले आहेत. एकाच खोलीत चार आमदार
राहत आहेत.
याशिवाय गावाकडून मंत्रालयात कामानिमित्त येणारे कार्यकर्ते गर्दी करतात. आंघोळीसाठी रांगेत उभे राहावे लागते, असे साबणे म्हणाले. तर काँग्रेसच्या जयकुमार गोरे यांनी आकाशवाणी आमदार निवासासमोरील रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याची तक्रार करत तेथे वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली. यावर तालिका अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
आमदारांची व्यथा
मंत्री आपापल्या बंगल्यात मजेत आहेत आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आमदारांची राहण्याची मात्र योग्य व्यवस्था नाही, अशी व्यथा आमदारांनी मांडली. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी आमदार मनीषा चौधरी यांनी निवासाच्या गैरसोयीचा मुद्दा मांडला.