Join us  

मराठी चित्रपटांची तारखांसाठी रस्सीखेच...!

By admin | Published: July 03, 2014 2:25 AM

अनेक मराठी चित्रपट एकत्रित प्रदर्शित झाल्यास त्याचा फटका कमी-जास्त प्रमाणात सर्वांना बसतो, हा अलीकडचा इतिहास ताजा आहे

राज चिंचणकर, मुंबईअनेक मराठी चित्रपट एकत्रित प्रदर्शित झाल्यास त्याचा फटका कमी-जास्त प्रमाणात सर्वांना बसतो, हा अलीकडचा इतिहास ताजा आहे. परंतु त्यापासून धडा घेण्यास मात्र फारसे कुणी उत्सुक असल्याचे चित्र नाही. याच गोष्टीवर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. याचे कारण म्हणजे या दोन महिन्यांत मराठी चित्रपटांचे पीक येऊ घातले असून, त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखांसाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. बाहेर पाऊस पडो अथवा न पडो, पुढील दोन महिन्यांत रुपेरी पडद्यावर मात्र मराठी चित्रपटांची बरसात होणार आहे.जून आणि जुलै महिन्यात प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेले काही चित्रपट पुढे ढकलले गेले आहेत. परिणामी चित्रपट प्रदर्शनासाठी आॅगस्ट महिन्यावर अतिरिक्त ताण पडणार आहे. हा ताण हलका होण्याच्या दृष्टीने आॅगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या काही चित्रपटांनी सप्टेंबर महिन्याकडे मोर्चा वळवला आहे. साहजिकच हे दोन महिने मराठी चित्रपटांसाठी सुुगीचे ठरणार आहेत. अर्थात याचा परिणाम व्हायचा तोेच होण्याची शक्यता सिनेसृष्टीत वर्तविण्यात येत आहे. याही स्थितीत जे चांगले आहे ते टिकेलच, असा सूूरही आळवण्यात येत आहे.विशेष म्हणजे आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये काही महत्त्वाचे व बहुचर्चित असे चित्रपट आहेत. पोश्टर बॉईज, गुलाबी, रमा माधव, राजवाडा, लोकमान्य, रेगे, स्वामी पब्लिक लिमिटेड, गुरूपौर्णिमा, पोरबाजार, हॅप्पी जर्नी, अवताराची गोष्ट, टपाल आदी चित्रपटांची वर्णी या महिन्यात लागणार असून, प्रत्येकाने या कालावधीतील तारखांवर आधीपासूनच हक्क बजावायला सुरुवात केली आहे. आॅगस्टमधले पाच आणि सप्टेंबरमधले चार शुक्रवार असे नऊ दिवस या व इतर चित्रपटांसाठी उपलब्ध आहेत. मात्र यातल्या काही शुक्रवारी दोनपेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. साहजिकच, प्रेक्षक व बॉक्स आॅफिसची विभागणी ही ठरलेली आहे. एखाद्या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला तर तो पुढच्या आठवड्यातही सुरू राहतो. त्यामुळे नवीन चित्रपटासाठी सिनेमागृह उपलब्ध होणे कठीण जाते.