मुंबई : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी महाबळेश्वर येथील जावळी गाव ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरणांतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.जावळी गाव ते लँडविक पॉइंट, तसेच प्रतापगड असा हा ५.६ कि.मी. विशाल रोपवे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर पोहोचण्यासाठी पर्यटकांना लागणारा वेळ कमी होणार असून, गडावर जाणे सोयीचे होणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी शासन व्यापक प्रयत्न करीत आहे.वाहतूक कोंडीची समस्या सुटणारप्रतापगडावर होणारा रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. प्रतापगडावर जाण्यासाठी घाटरस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, गडावर जाण्यासाठी अरुंद घाटरस्ता असल्याने वाहतुकीची कोंडी होते, तसेच पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना प्रतापगडावर जाणे सोईस्कर व्हावे, यासाठी रोपवे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली.
प्रतापगडावर जाण्यासाठी रोपवे!, आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 1:25 AM