रोझ डेनिमित्त बाजारात विविध प्रकारचे गुलाब दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:12+5:302021-02-07T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ७ फेब्रुवारीला दरवर्षी रोझ डे साजरा करण्यात येतो. या दिवशी गुलाबाच्या फुलाला मोठी मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ७ फेब्रुवारीला दरवर्षी रोझ डे साजरा करण्यात येतो. या दिवशी गुलाबाच्या फुलाला मोठी मागणी असल्याने मुंबईच्या फुल बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाब दाखल होतो. कॉलेजमधील तरुणाई हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करते. यंदा कोरोनामुळे कॉलेजमध्ये सर्व प्रकारचे डे रद्द करण्यात आले आहेत. यामुळे फुल बाजाराला याचा फटका बसला आहे. एकमेकांविषयी आदर, प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फूल देण्यात येते. व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रेमी जोडपे, नवरा-बायको यांच्यासोबतच कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी हेदेखील एकमेकांना गुलाब देतात. कोरोनामुळे यंदा अनेक मोठे कार्यक्रम रद्द झाल्याने बाजारातील फुलांची मागणी सुद्धा घटली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी फुलांची कमी लागवड केल्याची पाहायला मिळत आहे. मुंबईत अद्यापही कॉलेज बंद असल्याने यंदा कॉलेजमध्ये रोझ डे साजरा करण्यात येणार नाही. त्यामुळे कट्ट्यांवर, चौकांत तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी तरुणाई एकत्र येऊन रोझ डे साजरा करणार आहे. बाजारात यंदा नाशिक, सातारा व पुणे येथून विविध रंगछटा असणारे गुलाब दाखल झाले आहेत. यात मुख्यतः लांब दांडी असणाऱ्या लाल गुलाबाच्या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या फुलाची प्रतिनग किंमत १० ते १२ रुपये अशी आहे. तर गुलाब बंडल ७० ते ८० रुपयांना विकला जात आहे. गुलाबी, सफेद व पिवळ्या रंगाचे गुलाब बाजारात दाखल झाले असून, या गुलाबांना तुलनेने कमी मागणी आहे. या गुलाबाची किंमत १०० ते १२० रुपये बंडल अशा दरात आहे. रविवारी गुलाबाची विक्री जास्त प्रमाणात होण्याची आशा फूल विक्रेत्यांना आहे.