Join us

रोश हाशन्ना ! नववर्षासाठी बेने इस्रायली सज्ज 

By अोंकार करंबेळकर | Published: September 18, 2017 11:08 AM

हिंदूंचे नवेवर्ष गुढीपाडव्याला किंवा पारशी धर्मियांचे नववर्ष नवरोजला सुरू होते त्याप्रमाणे ज्यू बांधवांचे नवे वर्ष सुरू होणा-या दिवसाला रोश हाशन्ना असे म्हटले जाते. यंदा रोश हाशन्नाचा सण 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुरू होत आहे.

मुंबई, दि.18- हिंदूंचे नवेवर्ष गुढीपाडव्याला किंवा पारशी धर्मियांचे नववर्ष नवरोजला सुरू होते त्याप्रमाणे ज्यू बांधवांचे नवे वर्ष सुरू होणा-या दिवसाला रोश हाशन्ना असे म्हटले जाते. यंदा रोश हाशन्नाचा सण 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुरू होत आहे. तीन दिवस चालणारा हा पवित्र दिवसांचा सण 22 तारखेस संपेल. मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग यामध्ये बेने इस्रायली समुदाय राहतो. या बांधवांनी रोश हाशन्नाची जोरदार तयारी सुरू केली आहे.

रोश हाशन्ना या दिवशी नवे वर्ष सुरू होत असले तरी काही लोकांच्या मते शेतीचे नवे वर्ष या काळात सुरू होते, म्हणजेच नव्या पिकाची तयारी या काळात सुरू होते म्हणूनही हा सण साजरा केला जात असावा. या पवित्र दिवसांमध्ये गेलेल्या वर्षात झालेल्या चुका विसरणे, किंवा कुणाकडून चूक झाली असल्यास त्याला माफ करणे अपेक्षित असते. सर्व वाईट गोष्टी विसरुन नव्या उमेदीने वर्षाला सुरुवात करावी, अशी त्यामागे योजना असते. रोश हाशन्नाच्या पूर्वी काही लोक स्मशानात जाऊनही प्रार्थना करतात. तसेच सकाळी 'हातारत नोदारिम' ही प्रार्थना करतात.

रोश हाशन्नामध्ये शोफर या वाद्याला विशेष महत्त्व असते. शोफर हे मेंढ्याच्या वक्राकार शिंगापासून तयार केलेले असते. शंखासारखे फुंकून त्यातून पवित्र आवाज निर्माण केले जातात. रोश हाशन्ना शनिवारी येत असेल तर मात्र शोफर वाजवत नाहीत. रोश हाशन्नाच्या काळात मध आणि सफरचंद यांचं सेवन करणं आवश्यक आणि पवित्र मानलं जात. गोडाधोडाच्या पदार्थांबरोबरच कोबी, पालक, डाळिंब, मध, सफरचंद, खजूर, काकडी, मांस यांचाही आस्वाद जेवणात घेतला जातो. आज देशात ज्यू अत्यंत कमी संख्येने शिल्लक आहेत. गेली शेकडो वर्षे त्यांनी आपल्या प्रार्थना, सण, समारंभ, प्रार्थना व प्रथा इस्रायलपासून इतके दूर राहूनही जपल्या आहेत.

हलवा- रोश हाशन्नासाठी विशेष पक्वान्नरोश हाशन्नाच्या दिवशी सकाळी न्याहारीच्या निमित्ताने हलवा खाल्ला जातो. त्याचप्रमाणे यादिवशी शोफर या वाद्याचा पवित्र आवाज ऐकल्यानंतर हलवा आवडीने खाल्ला जातो. हलवा हा पदार्थ भारतीय ज्यूंमध्ये प्रसिद्ध आहे. विशेषत: मुंबई आणि ठाण्याचे आसपासच्या ज्यूंमध्ये हा केला जातो. भारतीय हिंदू आणि मुस्लीम यांच्या आहाराचा, पदार्थांचा ज्यूंच्या आहारावर परिणाम दिसून येतो. एडना सॅम्युएल अक्षीकर यांनी खास 'लोकमत'च्या वाचकांसाठी हलव्याच्या सोप्या कृतीचे वर्णन केले आहे.एडना यांचे वडील सॅम्युएल अक्षीकर दूध, गव्हाचे सत्त्व, साखर आणि वेलदोडे यांच्यापासून पाच तास खर्च करुन सुंदर हलवा बनवतात. पण आता इतका वेळ सहसा कोणाकडे नसतो त्यामुळे अर्ध्या तासात तयार होईल असा कॉर्नस्टार्च (मका) वापरुन हलवा तयार केला जातो. म्हणून त्यांनी केवळ 10 मिनिटांमध्ये तयार होईल, अशा चायना ग्रासपासून तयार होणा-या हलव्याची पाककृती दिली आहे.

चायना ग्रास हलवाघटक :-चायना ग्रास : १ पाकीट दूध : १ लीटरसाखर : दोन कपखाण्याचा रंग : चिमूटभर (ऐच्छिक)बेदाणे :२५ ग्रॅम्सतूप : दोन टेबलस्पूनकाजू : २५ ग्रॅम 

कृती:- चायना ग्रास सर्व बाजारांमध्ये पाकिटांत उपलब्ध आहे. कात्रीने किंवा सुरीने चायना ग्रासचे लहान तुकडे करून घ्या. एका तव्यात दोन चमचे तूप गरम करून त्यात बेदाणे एक-दोन सेकंद परतून तव्यावरून उतरवा. (हलवा करताना तवा नेहमी नॉनस्टीक वापरावा). यानंतर आधी तव्यावर अर्धा कप पाण्यामध्ये चायना ग्रास मिसळा आणि भिजू द्या. चायना ग्रास पाण्यामध्ये विरघळून जाईल. त्यानंतर त्यामध्ये दूध मिसळा आणि त्यास उकळी येऊ द्या. त्यानंतर साखर व खाण्याचा रंग घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. कारण अधिकवेळ गॅसवर राहिल्यास तो कडक होत जातो. आता त्यावर काजू व बेदाणे घालून सजवा. हा हलवा तासभर फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचे तुकडे करता येतील आणि आप्तेष्टांना सर्व्ह करताना तो आणखी सुंदर दिसेल.