'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करत उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे. कोरोनाची भीती मागे सारत गर्दी टाळून सर्वांनी बाप्पांचे स्वागत केले आहे. हे संकट लवकर दूर होऊ दे, तुझी सगळ्यांवर कृपा राहू दे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावं असं साकडं गणरायाला अनेकांनी घातलं आहे. यंदा सर्वच उत्सावावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे घरच्या घरीच बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
इको-फ्रेंडली गणेशोत्सव करण्याकडे हल्ली सर्वांचा अधिक कल असतो. रोट्रॅक्ट क्लब ऑफ उषा प्रवीण गांधी (UPG) महाविद्यालयानेगणेशोत्सवात यंदा एक आगळीवेगळी संकल्पना राबवली. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास ते नेहमीच प्राधान्य देत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे परिस्थिती थोडी गंभीर आहे. अशातच सणाचा आनंद घेण्यासाठी डिजिटल पद्धतीने ई-गणेशोत्सव साजरा केला आहे. यासोबतच सर्वांना आनंदाने घरच्या घरीच सुरक्षित सण साजरा करण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.
RCUPG च्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक अत्यंत भक्तीभावाने आणि हटके अंदाजात यंदाचा ई-गणेशोत्सव साजरा करत आहे. अनेक लोक यामध्ये सहभागी झाले असून 11 दिवस दररोज मनोरंजन आणि विविध प्रकारच्या गेमचं आयोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांनी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. 2010 पासून आतापर्यंत म्हणजे दहा वर्षे RCUPG विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. क्लबच्या माध्यमातून तरुणांना विविध गोष्टी शिकण्याची, नवे विचार, उमेद मिळण्याची उत्तम संधी मिळत आहे. डिजिटल पद्धतीने साजरा होत असलेला RCUPG ई-गणेशोत्सव सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.