मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्याची धार वाढविल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नावर राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी शुक्रवारी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समितीने आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत ४२ संघटना सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत सुरेश पाटील म्हणाले की, आरक्षण रद्द झाल्यानंतर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या समाजाच्या १२ पैकी ८ मागण्या मान्य केल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. मात्र, दहा महिने उलटले तरी यातील एकाही मागणीची अद्यापही पूर्तता झालेली नाही. आरक्षणाचा हक्क आता मागून नव्हे तर लढून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई येथील माथाडी भवनात शुक्रवारी राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद होत आहे. या परिषदेत विविध १९ मागण्यांवर चर्चा तसेच आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नरेंद्र पाटील, प्रसाद लाड, रमेश पाटील यांच्यासह कायदेविषयक तज्ज्ञ, याचिकाकर्ते, इतिहास संशोधक आणि राज्यभरातील विविध ४२ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.