मुंबई : रस्त्यांची १२०० कोटींच्या कामासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदेत अंदाजित रकमेपेक्षा ठेकेदारांनी कमी बोली लावली आहे. कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत असल्याने महापालिकेने ही निविदा रद्द करून फेरनिविदा मागविण्याची तयारी केली आहे. अंतिम निर्णय आयुक्त घेणार आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते खड्ड्यात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यानंतर १ ऑक्टोबरपासून मुंबईतील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यानुसार १२०० कोटींच्या कामाचे कंत्राट लवकरच दिले जाणार आहे. शहर भागासाठी सात, पूर्व उपनगरांमध्ये १२ आणि पश्चिम उपनगरांतील १३ रस्ते कामांच्या कंत्राटांसाठी मागविलेल्या निविदांमध्ये ठेकेदारांनी अंदाजित दरापेक्षा ३० टक्के कमी बोली लावल्या आहेत. भाजपने यास विरोध करीत फेरनिविदा मागविण्याची मागणी केली होती.
रस्ते विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी, एवढ्या कमी बोलीत रस्ते कामाचा दर्जा ठेकेदार कसा राखणार? याबाबत रस्ते विभागाकडून मागील आठवड्यात स्पष्टीकरण मागविले होते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार सर्वांत कमी बोली लावणाऱ्या ठेकेदारालाच काम देण्यात येते असे स्पष्ट केले. रस्त्यांच्या कामांची अचानक तपासणी, साहित्यांची पालिकेच्या प्रयोगशाळेत चाचणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
अटींमध्ये बदल?
पालिका प्रशासनाने या निविदा रद्द करीत नव्याने निविदा मागविण्याची तयारी सुरू केली आहे. अटीमध्ये काही बदल करीत छोट्या निविदा मागविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या अटींमुळे आरएससी व अस्फाल्ट प्लांट असलेल्या ठेकेदारांनाच निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल, असे समजते.
........................
रस्ते कामांचा दर्जा राखला जाणे आवश्यक आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र विभाग आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांनाही कालांतराने पालिकेत प्रवेश मिळतो, अशी आजची परिस्थिती आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे लवकरात लवकर निविदा काढून काम होणे आवश्यक आहे.
- विनोद मिश्रा (नगरसेवक, भाजप)
..................................
* ९ एप्रिल ते ११ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये रस्त्यांवरील ३३ हजार १५६ खड्डे बुजविले आहेत.
* आतापर्यंत विभाग कार्यालयातील कामगारांमार्फत २४ हजार ३० खड्डे बुजविण्यात आले आहेत, तर खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत नऊ हजार १२६ खड्डे बुजविण्यात आले आहेत.
* पालिकेच्या आकडेवारीनुसार सध्या ३०६ खड्डे बुजविण्यात आलेले नाही. मात्र, मागील काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांची प्रत्यक्ष संख्या याहून जास्त असण्याची शक्यता आहे.