सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत एसटीच्या ९९५ फेऱ्या धावल्या. यातून १४ हजार ५०० प्रवाशांनी प्रवास केला.
मुंबई : मुंबई हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अतिरिक्त एसटीच्या बस सुरू करण्यात आल्या. एसटी महामंडळाने सोमवारीच्या गर्दीचा अंदाज घेत मंगळवारी जादा फेऱ्या चालविल्या. प्रवासीही वाढले. दरम्यान, मंगळवारी एसटी बसमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचे पालन केल्याचे दिसून आले.
दोन महिन्यांनंतर मुंबईत ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अतिरिक्त एसटीच्या बस सुरू करण्यात आल्या. मिशन बिगीन अगेनच्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती केली आहे. तर, खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली. त्यामुळे सोमवारी, प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी एसटीने अतिरिक्त २५० बसचे नियोजन केले होते. मात्र, या नियोजनाचा सोमवारी फज्जा उडाला. सोमवारी एसटी बसमध्ये प्रवासी उभ्याने प्रवास करताना दिसून आले. एसटी महामंडळाने यातून बोध घेत मंगळवारी जादा फेऱ्या चालविल्या. एसटी महामंडळाच्या पनवेल, पालघर, आसनगाव ,विरार, नालासोपारा ,वसई, बदलापूर येथून मंत्रालय, महापालिका भवन या मार्गावर सोमवारी ४ वाजेपर्यंत एसटी बसच्या ७१७ फेऱ्या धावल्या. यातून १३ हजार ७८ प्रवाशांनी प्रवास केला. तर, याच मार्गावर मंगळवारी ४ वाजेपर्यंत एसटी बसच्या ८०३ फेऱ्या धावल्या. यातून १३ हजार ५०० प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे प्रवाशांपेक्षा फेऱ्या वाढल्याने एसटी बसमध्ये गर्दीचे नियोजन करणे सोयीस्कर झाले.