खुल्या जागेत कार्यक्रमासाठीचा मार्ग अखेर खुला, ७२ तासांत परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:02 AM2017-11-03T07:02:06+5:302017-11-03T07:03:40+5:30
मुंबईत खुल्या जागेत कार्यक्रम घेण्यासाठी आतापर्यंत आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांसाठी अर्जदाराला करावी लागणारी पायपीट आता थांबणार आहे. वेगवेगळ्या खात्यांकडे स्वतंत्रपणे अर्ज करण्यात बराच वेळ जात असल्याने पालिका प्रशासनाने एक खिडकी योजना आणली आहे.
मुंबई : मुंबईत खुल्या जागेत कार्यक्रम घेण्यासाठी आतापर्यंत आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांसाठी अर्जदाराला करावी लागणारी पायपीट आता थांबणार आहे. वेगवेगळ्या खात्यांकडे स्वतंत्रपणे अर्ज करण्यात बराच वेळ जात असल्याने पालिका प्रशासनाने एक खिडकी योजना आणली आहे. यामुळे अर्ज केल्यापासून ७२ तासांत कार्यक्रमाला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच सामाजिक, धार्मिक, पारंपरिक कला, सर्कस, जत्रा यासारख्या बाबींकरिता पूर्वीच्याच दराने शुल्क आकारणी केली जाणार आहे.
मुंबईतील खुल्या जागा, मैदान, उद्यानावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खाते, इमारत व कारखाने खाते, परिरक्षण आणि अनुज्ञापन अशा चार खात्यांकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते. तसेच ही परवानगी मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे आकारण्यात येणारे शुल्क हे यापूर्वी प्रति चौरस मीटर पद्धतीने आकारण्यात येत होते. ज्यामुळे शुल्क आकारणी प्रक्रिया क्लिष्ट व वेळकाढू होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन आता कार्यक्रम परवानगी प्रक्रिया व त्यासाठीची शुल्क आकारणी प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे.
अशी मिळेल परवानगी
पालिकेच्या एक खिडकी योजनेमुळे कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अर्जदाराला चार खात्यांऐवजी केवळ महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अग्निशमन परवानगी आवश्यक असल्यास त्याबाबतचा उल्लेख याच अर्जात करून त्याची प्रक्रियादेखील या एकाच अर्जाच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे.
अशी असेल शुल्क आकारणी
कार्यक्रम परवानगीसाठी यापूर्वी प्रति चौरस मीटर आधारावर शुल्क आकारणी केली जात असे. मात्र या पद्धतीमध्ये अनेकदा कार्यक्रमाच्या प्रस्तावित स्थळाचे प्रत्यक्ष मोजमाप घेऊन शुल्क निश्चिती करणे आवश्यक असायचे. यामध्ये वेळ खर्च होण्याची शक्यता होती. मात्र, आता शुल्क आकारणी प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. यामध्ये कार्यक्रम स्थळाचा आकार ५०० चौरस मीटर असल्यास, ५०० चौरस मीटर ते १००० चौरस मीटरपर्यंत आणि १००० चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराचे कार्यक्रमस्थळ असे तीन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. ज्यामुळे शुल्क गणना सुलभ व जलद करणे शक्य होणार आहे.
७२ तासांत परवानगी
अर्जदाराने कार्यक्रम परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर किती शुल्क भरावे लागेल, याबाबतची माहिती विभाग कार्यालयाद्वारे अर्जदारास दिली जाणार आहे. त्यानुसार अर्जदाराने महापालिकेकडे शुल्क रक्कम भरल्यानंतर ७२ तासांच्या कालावधीत अर्जदारास ‘कार्यक्रम परवानगी’ मिळू शकणार आहे, अशी माहिती व्यवसाय विकास कक्षाद्वारे देण्यात आली.
यापूर्वी या विभागांचा मार्ग सुलभ
इझ आॅफ डुइंग बिझनेस अंतर्गत आतापर्यंत दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित परवानगी, सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येणाºया उपाहारगृह व आरोग्यविषयक परवानगी, अनुज्ञापन खात्याद्वारे दिला जाणारा व्यापार परवाना आणि इमारत व कारखाने खात्याद्वारे दिल्या जाणाºया परवानग्या यापूर्वीच सुलभ करण्यात आल्या आहेत.