मुंबई : कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या दुर्घटनेने गच्चीवरील रेस्टॉरंटचा धोका दाखवून दिला. त्यामुळे पालिका महासभेत हे धोरण अंतिम मंजुरीसाठी आल्यानंतर त्यास जोरदार विरोध होईल, असे बोलले जात होते. मात्र, पहारेकºयांचा लटका विरोध आणि विरोधकांच्या गोंधळानंतर हे धोरण मंजूर करण्यात आले. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी यापूर्वीच गच्चीवरील रेस्टॉरंटच्या धोरणाला मंजुरी दिल्याने त्यावर चर्चेची गरज नाही, अशी भूमिका घेत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव झटपट मंजूर केला. यामुळे वादग्रस्त ठरलेल्या गच्चीवरील रेस्टॉरंटचा मार्ग मोकळा झाला आहे.गच्चीवरील रेस्टॉरंटचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळल्यानंतर, याबाबतचे धोरण पालिकेच्या महासभेपुढे प्रलंबित होते. मात्र, यावर ९० दिवसांमध्ये सभागृहाने निर्णय न घेतल्यास हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी तरतूद आयुक्त अजय मेहता यांनी केली होती. त्यानुसार, १ नोव्हेंबर रोजी आयुक्तांनी धोरण मंजूर करीत, तत्काळ लागू करण्याचे परिपत्रकही काढले.शिवसेनेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने, या धोरणावर राजकीय पक्षांना चर्चा करून न देण्याची भूमिका सत्ताधाºयांनी घेतली. सुधार समितीत विरोध केल्यानंतर मूकसंमती देऊन अडचणीत आलेल्या भाजपाने पुन्हा यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यानुसार, हा प्रस्ताव पालिका महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी आला असता, भाजपाने बोलण्याची संधी मागून आमचा या प्रस्तावाला विरोध असल्याचे दाखवत, आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाच्या लटक्या विरोधामुळे काँग्रेस पक्षाचे बळही कमी पडले. हा प्रस्ताव यापूर्वीच आयुक्तांनी मंजूर केल्याने, यावर महापौरांनी चर्चा नाकारली. त्यामुळे गच्चीवरील रेस्टॉरंटच्या धोरणाला अखेर अंतिम मंजुरी मिळाली.
गच्चीवरील रेस्टॉरंटचा मार्ग अखेर झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 5:01 AM