मुंबई/ नवी दिल्ली- महाराष्ट्रात मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरु केलेल्या हनुमान चालिसा पठणाचं लोण आता उत्तर प्रदेशातंही पोहोचलं आहे. उत्तर प्रदेशातल्या कासगंज आणि अलिगडमध्ये मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यास सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्राच्या लाऊडस्पीकर वादाचा आवाज आता देशाच्या विविध भागात पोहोचत आहे. उत्तर प्रदेशातही हा वाद जोर धरताना दिसत आहे. यूपीच्या अलीगढमधील युवा क्रांती मार्चच्या डझनभर कार्यकर्त्यांनी गांधी पार्क परिसरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचं पठण केलं.
युवा क्रांती मंचाने मशिदीवरील लाऊडस्पीकर काढण्यासाठीचे निवेदन दिले होते. पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यापुढच्या काळात चौकात लाऊड स्पीकर लावण्याची मोहीमही राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहाटे ५ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता हनुमान चालीसा पठण करण्यासोबतच आरतीही गाण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. ३ मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलाही तेढ निर्माण करायचा नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
हिंदू संघटनांचा इशारा-
मशिदीतून येणार्या आवाजामुळे ते त्रस्त झाल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. हा आवाज थांबवला नाही, तर ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा पठण केले जाईल.