कोळी महिला काढणार मंत्रालयावर धडक मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:54 AM2018-12-10T00:54:06+5:302018-12-10T00:54:38+5:30
मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई : येत्या मंगळवारी, ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कोळी महिलांच्या विविध मागण्यांचा उहापोह करण्यासाठी गिरगाव येथील तारापोरवाला मत्स्यालय ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यातील विविध सागरी किनारपट्टीवरील कोळी महिला मासळी बाजार बंद करून हातात कात्या व कोयता घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहेत. नॅशनल फिश वर्कस् फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, कोळी महासंघ आणि इतर संस्थांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान निराधार व विधवा कोळी महिलांना किंवा ज्यांचे वय ६० पेक्षा जास्त आहे; त्यांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन लागू करावी. मुंबईतील सर्व मच्छीमार्केट कोळी महिलांच्या सहकारी संस्थेच्या नावे करून ते विकसित करण्यास व चालविण्यास महिला सहकारी संस्थेस द्यावेत, कोळी समाजाच्या समस्या सोडविण्याकरिता प्रत्येक सागरी जिल्ह्यात राजकीय प्रतिनिधित्व द्यावे, कोळीवाड्यांचे व कोळी समाजाच्या गावठाणाचा विस्तार करून कोळी समाजाच्या वाढत्या कुटुंबास समाविष्ट करणारी दीर्घकालीन घरकुल योजना मंजूर करावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सर्व कोळीवाड्यातून तयारी करण्यात आली आहे़