Join us

'फटका' गँगविरोधात RPF ची धडक कारवाई, ट्रेनच्या दरवाजात उभ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन करायचे मोबाइल चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 11:44 AM

ट्रेनमध्ये प्रवास करत असताना दरवाज्यात उभ्या प्रवाशांच्या हातावर वार करुन मोबाइल चोरी करणा-या फटका गँगविरोधात आरपीएफने धडक कारवाई सुरु केली आहे

मुंबई - ट्रेनमध्ये प्रवास करत असताना दरवाज्यात उभ्या प्रवाशांच्या हातावर वार करुन मोबाइल चोरी करणा-या फटका गँगविरोधात आरपीएफने धडक कारवाई सुरु केली आहे. गेल्याच आठवड्यात फटका गँगविरोधात कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पथकं पाठवली होती. आरपीएफ जवानांनी अंडरकव्हर कारवाई करत 15 जणांना अटक केली आहे. पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाइनवर ही कारवाई करण्यात आली. 15 जणांपैकी पाच जणांना अंधेरी, तिघांना मुंबई सेंट्रल आणि दादर तर दोघांना वांद्रे आणि एकाला बोरिवली आणि मालाडमधून अटक करण्यात आली. 

चोरांना अटक करण्यासाठी आरपीएफ जवान वेष बदलून रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आले होते. यामधील काही जवान मोबाइल फोन हातात घेऊन जाणुनबुजून ट्रेनच्या दरवाजातून प्रवास करत होते. जवानांचं एक पथक जीन्स आणि टी-शर्ट घालून अंधेरी आणि गोरेगावच्या दरम्यान उभं होतं. चोरांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांना दुर्बिण देण्यात आल्या होत्या. काही जवान तर गर्दुल्ले म्हणून वावरत होते. 

'एका पथकाने दोन व्यक्ती ट्रॅकवर येत असल्याचं पाहिलं. जसजशी ट्रेन जवळ येऊ लागली ते खांबाव चढले आणि दरवाजात उभ्या प्रवाशांना टार्गेट करु लागले. जोपर्यंत मोबाइल प्रवाशाच्या हातून पडत नव्हता तितका वेळ ते प्रयत्न करत होते. किमान चार ते पाचवेळा त्यांना प्रवाशाच्या हातावर वार केला असावा. मोबाइल खाली पडला की ते तो उचलून चालू लागत असे', अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिका-याने दिली आहे. 

आरपीएफच्या पथकांनी एकमेकांशी संवाद साधला आणि चोरांचा पाठलाग केला. एका दुकानाजवळ आपल्याकडे किती माल जमा झाला आहे हे पाहण्यासाठी चोर थांबले असता आरपीएफने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. विशेष म्हणजे चोरांमध्येही समनव्य होता ज्यामुळे चोरी केल्यानंचर चोर अपघात होऊ नये यासाठी ट्रॅकवरुन धावत नसे. सध्या आरपीएफने प्रवाशांच्या अपघाताला कारणीभूत ठरणा-या या चोरांविरुद्ध मोहिम उघडली आहे.