सोमवारी पहाटे जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेतील आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एएसआय यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. दोघांमधील वाद इतका वाढला की आरोपी कॉन्स्टेबलने आपली रायफल काढून गोळीबार सुरू केला. या घटनेत एएसआयसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. जीआरपी आणि आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेचा तपास सुरू आहे.
जयपूर एक्स्प्रेस ट्रेन गुजरातहून महाराष्ट्राच्या दिशेने जात होती. त्यानंतर पहाटे पाच वाजता पालघर स्थानकाजवळील बोगी क्रमांक-5 मधून गोळीबाराचे आवाज येऊ लागले. यावेळी गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. या घटनेत आणखी काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.
मुंबई-जयपूर ट्रेनमधील 'तो' ३० मिनिटांचा थरार; प्रवाशांनी मारल्या ट्रेनमधून उड्या
दुसऱ्या बोगीतील तीन प्रवाशांचा या घटनेत मृत्यू झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरपीएफ जवान मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी याने त्याच्या एस्कॉर्ट ड्युटी इनचार्ज एएसआय टिका राम मीना यांना चालत्या ट्रेनमध्ये गोळ्या घातल्या. आपल्या सिनियरला गोळ्या घालल्यानंतर तो दुसऱ्या बोगीत गेला आणि तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मीरा रोड आणि दहिसर दरम्यान ट्रेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यत घेऊन त्याचे शस्त्रही जप्त केले. बोरिवली रेल्वे स्थानकावरील रेल्वेतून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे, आरोपी आरपीएफ जवान सध्या मीरा रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.