मुंबई : गुरे धडकल्याने सतत चर्चेत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) सुरक्षा कवच लाभणार आहे. मुंबई-अहमदाबाद या दरम्यान मार्गात गुरे येऊ नयेत यासाठी आरपीएफने मार्गालगतच्या गावांतील ५० सरपंचांच्या बैठका घेऊन गुरांना आवर घालण्याचे आवाहन केले आहे.
जनावरांच्या धडकेमुळे वंदे भारत या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वाहतुकीत अडथळा तर येतोच शिवाय प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. याच महिन्यात अशा तीन घटना घडल्या. २०२२मध्ये आरपीएफने आतापर्यंत संवेदनशील ठिकाणी १ हजार २३ जनजागृती मोहिमा राबविल्या आहेत. याशिवाय रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूच्या सर्व गावांच्या सरपंचांची आरपीएफने बैठक घेतली आहे.
...अन्यथा एक वर्षाचा तुरुंगवास
दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा रेल्वे कायदा १९८९च्या तरतुदींमध्ये जनावरांच्या मालकांवर कलम १५४ अंतर्गत रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासाठी एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. तर कलम १४७ नुसार रेल्वे रूळ ओलांडणे किंवा रेल्वे रूळ न ओलांडण्यास नकार देणे यासाठी सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपयांचा दंड किंवा दोन्हीही याची तरतूद आहे.